Tue, Apr 23, 2019 19:32होमपेज › Konkan › सिंधुदुर्गात मराठा एकजुटीचा एल्गार! 

सिंधुदुर्गात मराठा एकजुटीचा एल्गार! 

Published On: Jul 27 2018 1:25AM | Last Updated: Jul 26 2018 10:54PMकणकवली : प्रतिनिधी

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या जिल्हा बंदला गुरुवारी सिंधुदुर्गात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील सर्वच बाजारपेठांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला.  महामार्गावर आणि राज्यमार्गांवर टायर पेटवून, झाडे तोडून, सिमेंट पाईपचे अडथळे आणून, विद्युत पोल आडवे टाकून गनिमी काव्याने मार्ग रोखत मराठा समाजबांधवांनी रॅली काढून जोरदार घोषणाबाजी करत मराठा एकजुटीचा एल्गार केला. तर कसाल पुलानजीक ओसरगाव येथे हायवेवर टायर पेटवून वाहतूक रोखण्याचा प्रयत्न करणार्‍या आंदोलक आणि पोलिसांमध्ये जोरदार धुमश्‍चक्री झाली. यावेळी पोलिसांनी लाठीचार्जही केला. यामध्ये पाच पोलिस आणि दोन आंदोलनकर्ते जखमी झाले. 

पोलिसांना मारहाण केल्याप्रकरणी सहाजणांना ताब्यात घेण्यात आले आहे. साळगावातही एका आंदोलनकर्त्या मुलावर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याने आंदोलक संतप्त झाले. या आंदोलनामुळे जिल्ह्यातील एसटी सेवा पूर्णपणे ठप्प झाली होती. सायंकाळपर्यंत जवळपास 850 फेर्‍या रद्द झाल्या होत्या. 6 बसेसची तोडफोड करण्यात आल्याचे सांगण्यात आले. 

या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर सिंधुदुर्ग पोलिसांनी सर्वत्रच कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवला होता. मात्र, मराठा आंदोलकांनी गनिमी काव्याने पोलिसांच्या नजरा चुकवत महामार्ग आणि राज्यमार्गांवर वाहतुकीस अडथळे आणले. त्यामुळे या दोन्ही मार्गांवरची वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. गुरुवारी सकाळपासूनच मराठा समाजबांधव त्या त्या भागात एकत्र आले होते. बंदमुळे एकही दुकान, हॉटेल किंवा टपरीही उघडी नव्हती. कणकवलीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा समाजबांधव एकत्र आले आणि मराठा आरक्षणासाठी जोरदार घोषणाबाजी केली.

त्याचदरम्यान वागदे, जानवली अशा ठिकठिकाणी महामार्गांवर टायर पेटवून वाहतूक रोखण्यात आली होती. पोलिस नंतर त्याठिकाणी जावून पेटते टायर  बाजूला करत होते. काही ठिकाणी झाडे तोडून टाकण्यात आली होती. दुपारी रॅलीने सर्व समाजबांधव पटवर्धन चौकात गेले आणि त्या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करत तहसीलदारांना निवेदन दिले. खारेपाटण, नांदगाव, तळेरे, फोंडाघाट, कनेडी अशा सर्वच ठिकाणी बाजारपेठा बंद होत्या. महामार्गावर तळेरे, खारेपाटण, नांदगाव येथे समाजबांधवांनी रास्तारोको केला. कणकवली प्रमाणेच सावंतवाडी, कुडाळ, वेंगुर्ले, देवगड, मालवण, वैभववाडी, दोडामार्ग अशा सर्वच तालुक्यांमध्ये मराठा समाजबांधवांनी एकजूट दाखवत आंदोलन यशस्वी केले.

या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर एसटी महामंडळाने गुरूवारी दिवसभर सर्वच फेर्‍या रद्द केल्या. सायंकाळी 4 वा. पर्यंत 877 पैकी 849 फेर्‍या रद्द करण्यात आल्याचे विभाग नियंत्रकांनी सांगितले. तर कुसबांव, हिर्लोक, फोंडाघाट, वेंगुर्ले या ठिकाणी एसटी बसेसवर दगडफेक करून काचा फोडण्यात आल्या. एसटी सेवाच ठप्प झाल्याने सर्व रस्ते सुनेसुने दिसत होते. या आंदोलनाला खाजगी वाहतूकदारांनीही पाठिंबा दिला होता. कुडाळ-हिंदेवाडी व गिरगांव-कुसगांव या बसेसवर हिर्लोक येथे दगडफेक झाल्याने चालक तुकाराम शेळके यांच्या हाताला दगड लागून ते जखमी झाले. हिर्लोक, नारूर, गोठोस गावात मार्गावर झाडे पाडून वाहतूक रोखण्यात आली होती. तळेरेत महामार्गावर ठिय्या आंदोलन करण्यात आले. तर कसाल येथे एक जुनी अपघातग्रस्त इनोव्हा कार जाळण्यात आली. देवगडात तळेबाजार येथे काहींनी मुंडन करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. साळगांवमध्ये आंदोलनकर्त्या एका मुलावर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याने आंदोलक संतप्त झाले. जमावाच्या भावना लक्षात घेऊन कुडाळ पोलिस निरीक्षकांनी दिलगिरी व्यक्‍त केल्यानंतर आंदोलक शांत झाले. वेंगुर्ले आडेलीत निदर्शने करणार्‍यांना ताब्यात घेण्यात आले. मातोंड-वेंगुर्ले ही एसटी बस होडावडा येथे पंक्‍चर करण्यात आली. 

टायर जाळपोळ, रास्तारोको या बाबी वगळता आंदोलन शांततेत पार पडले. कसाल पुलानजीक आंदोलनकर्त्या कार्यकर्त्याला पोलिस चालकाने अपशब्द वापरल्याने त्या ठिकाणी पोलिस आणि आंदोलकांत धुमश्‍चक्री उडाली. पोलिसांच्या लाठीमारात आंदोलक जखमी झाले तर पोलिसांनाही दुखापत झाली. या प्रकरणी आ. वैभव नाईक व आ. नितेश राणे यांनी ओरोस पोलिस स्थानकात ठाण मांडून अपशब्द वापरणारा पोलिस जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत येथून हटणार नाही असा पवित्रा घेतला. शेवटी त्या पोलिसाला माफी मागावी लागली.

सावंतवाडीमध्येही मराठा समाजबांधव आक्रमक झाले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे मोती तलावात विसर्जन करण्यात आले. जिल्हा बंद आंदोलनामुळे शहरी भागातील शाळा, कॉलेज बंद होत्या तर ग्रामीण भागात अपवाद वगळता शाळा सुरू होत्या. एकूणच मराठा समाजाच्या या आंदोलनाने संपूर्ण जिल्हा प्रभावित झाला होता. राज्याच्या इतर भागाप्रमाणेच सिंधुदुर्गातील सकल मराठा समाजबांधवांनी जिल्ह्यात हे आंदोलन यशस्वी करून दाखविले. या आंदोलनाला समाजातील सर्वच स्तरातील घटकांनी उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिला.