Mon, Jul 22, 2019 04:40होमपेज › Konkan › मराठा आरक्षण : आज जिल्हा बंद

मराठा आरक्षण : आज जिल्हा बंद

Published On: Aug 03 2018 1:35AM | Last Updated: Aug 02 2018 10:42PMरत्नागिरी : विशेष प्रतिनिधी

आरक्षणासह विविध मागण्यांसाठी सकल मराठा समाजातर्फे शुक्रवार दि.3 ऑगस्ट रोजी ‘जिल्हा बंद’ची हाक देण्यात आली आहे. जिल्ह्यातील रिक्षा वाहतूक, विद्यार्थी वाहतूक, मोटार वाहतूक संघटनेसह व्यापारी संघटना यामध्ये सहभागी होणार आहेत. या बंदबाबत जनजागृती करण्यासाठी रत्नागिरी शहरात रॅलीही काढण्यात आली.

मराठा समाजाच्या जिल्हा बंद आवाहनाच्या पार्श्‍वभूमीवर एस.टी. बस सेवा सुरळीत चालू राहण्यासाठी पोलिस बंदोबस्त मागण्यात आला आहे. त्यामुळे शुक्रवारची बस सेवा पोलिस बंदोबस्तात सुरू असल्याचे पहावयास मिळणार आहे. बंदला पाठिंबा देण्यासाठी एस.टी. सेवा बंद ठेवण्याची विनंती सकल समाजाकडून करण्यात आली आहे.

आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने 3 ऑगस्ट रोजी ‘जिल्हा बंद’चे आवाहन करण्यात आले आहे. राज्यात ठिकठिकाणी होणार्‍या मराठा समाजाच्या आंदोलनाला अनेक ठिकाणी हिंसक वळण लागले. या पार्श्‍वभूमीवर गुरुवारपासूनच सर्वत्र याचीच चर्चा सुरू होती. त्यामुळे शुक्रवारचा बंद यशस्वी होण्याच्या मार्गावर आहे. आतापर्यंत जिल्ह्यात या विषयावर वातावरण शांत होते ते बंदच्या आवाहनावर पेटेल, अशी भीती निर्माण झाली आहे.

रिक्षावाले, दुकानदार अशी सर्वच मंडळी बंदचे काय? असा सवाल गुरूवारी दिवसभर परस्परांना विचारत होते. जो तो आम्ही बंद ठेवणार, नुकसान करून कोण घेणार? अशी मते मांडत होता. दरम्यान, गुरूवारी सायंकाळी सकल मराठा समाजाच्या वतीने बंद यशस्वी करण्यासाठी जनजागृती रॅली काढण्यात आली. एसटी महामंडळाच्या अधिकार्‍यांनी बैठक घेऊन सेवा सुरू ठेवण्याबाबत विचारविनिमय केला.

मराठा समाजाने आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी एसटी सेवा बंद ठेवण्याची विनंती लेखी निवेदनाद्वारे केली. या पार्श्‍वभूमीवर महामंडळाच्या अधिकार्‍यांनी बैठक घेऊन सेवा सुरू ठेवण्यासाठी पोलिस बंदोबस्त मागण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शुक्रवारची एसटी सेवा पोलिस बंदोबस्तात पहावयास मिळणार आहे.