होमपेज › Konkan › मराठा आरक्षण : बाबा सावंत यांच्यासह २२ आंदोलकांवर गुन्हा

मराठा आरक्षण : बाबा सावंत यांच्यासह २२ आंदोलकांवर गुन्हा

Published On: Jul 28 2018 1:34AM | Last Updated: Jul 27 2018 11:24PMकणकवली : प्रतिनिधी

ओसरगाव-कसाल नदी पूलदरम्यान ओवळीये फाट्याजवळ महामार्गावर टायर पेटवणार्‍या मराठा समाज आंदोलकांना पांगविण्यासाठी गेलेल्या पोलिस कर्मचार्‍यांपैकी एकाने आंदोलकांना अपशब्द वापरल्याने संतप्त झालेले आंदोलक आणि पोलिसांमध्ये जोरदार झटापट झाली होती. यावेळी लाठीचार्जही पोलिसांनी केला होता. या झटापटीत एका पोलिस कर्मचार्‍याला गंभीर दुखापत झाली.अधिकार्‍यासह इतर तीन पोलिस कर्मचारी जखमी झाले होते. याप्रकरणी पोलिसांनी आंदोलक प्रशांत ऊर्फ बाबा रामदेव सावंत आणि बाळासाो आप्पासाो  सूर्यवंशी यांच्यासह 20 ते 22जणांविरूध्द पोलिस कर्मचार्‍याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा भांदवि 307  व सरकारी काम करत असताना गंभीर दुखापतीचा भांदवि 333 चा गुन्हा दाखल केला आहे. 

यापैकी जखमी झालेले बाबा सावंत यांच्यावर ओरोस जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू असून डिस्चार्ज दिलेले बाळासाो सूर्यवंशी यांना कणकवली पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी अटक केली. गुरूवारी सिंधुदुर्ग जिल्हा सकल मराठा समाजाने जिल्हा बंद आंदोलन पुकारले होते. यावेळी मुंबई-गोवा महामार्गावर अनेक राज्यमार्गांवर मराठा समाज आंदोलकांनी टायर पेटवून, सीमेंट पाईप आडवे लावून, झाडे तोडून वाहतूकीस अडथळा निर्माण केला होता. सकाळी पावणेबाराच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावर ओसरगाव-कसालनजीक पुलादरम्यान ओवळीये फाट्यावर मराठा समाज आंदोलकांनी महामार्ग रोखण्यासाठी टायर पेटवले होते.

यावेळी पेट्रोलिंगवर असलेल्या सिंधुदुर्गनगरी पोलिस स्थानकाचे प्रमुख सौ. पाटील, पोलिस कर्मचारी आशिष शेलटकर, श्री. लोबो, श्री. कोयंडे, महिला पोलिस कर्मचारी दुर्वा सावंत असे त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी आंदोलकांना टायर बाजूला टाकू द्या, वाहतूक सुरू राहू दे असे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंदोलक महामार्ग रोखण्याच्या मुद्यावर ठाम होते. यावेळी चालक पोलिस विठ्ठल कोयंडे यांनी आंदोलकांना अपशब्द वापरल्याने आंदोलक संतप्त झाले आणि पोलिस व त्यांच्यात जोरदार झटापट झाली.

पोलिसांनी लाठ्या काढून त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांच्याच लाठ्यांनी आंदोलकांनी पोलिसांना मारहाण केली. तर एकाने तेथील फरशीचा तुकडा पोलिसांच्या दिशेने फेकला असता तो पोलिस नाईक आशिष शेलटकर यांच्या डोक्याला लागला आणि ते गंभीर जखमी झाले. त्यांच्या डोक्याला सात टाके पडले आहेत. तर एपीआय सौ. पाटील यांच्या हाताला व अन्य दोन कर्मचार्‍यांच्या डोक्याला दुखापत झाली. तर या झटापटीत आंदोलक बाबा सावंत आणि बाळासाहेब सूर्यवंशी हेही जखमी झाले. त्यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार करण्यात आले. जखमी पोलिस आशिष शेलटकर आणि बाबा सावंत यांच्यावर अद्यापही जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तर बाळासाहेब सुर्यवंशी यांना रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर शुक्रवारी सायंकळी कणकवली पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. 

याप्रकरणी पोलिस नाईक आशिष शेलटकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार प्रशांत उर्फ बाबा सावंत आणि बाळासाहेब सुर्यंवशी यांच्यासह 20 ते 22 जणांविरूध्द जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, सरकारी कामात अडथळा आणणे, सरकारी काम करत असताना गंभीर दुखापत करणे, जिल्हाधिकार्‍यांनी घोषित केलेल्या मनाई आदेशाचा भंग करणे असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी अधिक तपास कणकवलीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक एस. एस. ओटवणेकर हे करत आहेत.