Sat, Dec 07, 2019 21:34



होमपेज › Konkan › भाजपमध्ये ‘इनकमिंग’ची तयारी जोरात

भाजपमध्ये ‘इनकमिंग’ची तयारी जोरात

Published On: Sep 18 2018 1:36AM | Last Updated: Sep 17 2018 8:14PM



रत्नागिरी : शहर वार्ताहर

राज्य विधानसभा तसेच लोकसभा निवडणूकमध्ये होणार असल्याने राजकीय पक्षांमध्ये नेत्या कार्यकर्त्यांची ये-जा सुरू झाली आहे. केंद्रात व राज्यातही भाजपचे सरकार असल्याने जिल्ह्यातील कॉँग्रेस तसेच अन्य पक्षांमधील नेते आता भाजपच्या वाटेवर आहेत. भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या रत्नागिरी दौर्‍यात कॉँग्रेस मधील नाराज पदाधिकार्‍यांनी भेट घेऊन खलबते केली. 

भाजपचे रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ निवडणूकप्रमुख म्हणून आमदार प्रसाद लाड यांच्याकडे पक्षाने जबाबदारी सोपवली आहे. त्यानंतर आ. लाड यांचा या लोकसभा मतदासंघातील संपर्क वाढला आहे. दोन्ही जिल्ह्यांतील भाजप पदाधिकार्‍यांची बैठकही लाड यांच्या उपस्थितीत घेण्यात आली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील कॉँग्रेसच्या काही जिल्हास्तरीय नेत्यांनी, जुन्या पदाधिकार्‍यांनी रत्नागिरीत आमदार लाड यांची भेट घेतली व त्यांच्याशी गुप्त चर्चा केली. त्यामुळे राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कॉँग्रेससह अन्य पक्षांमधील नाराज नेत्यांनीही लाड यांची भेट घेतल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक नेते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. 

लोकसभा व विधानसभा निवडणुकीची व्यूहरचना भाजपकडून या लोकसभा मतदारसंघात आखण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात भाजपची ताकद अन्य पक्षांच्या तुलनेत कमी आहे. रत्नागिरीच्या तुलनेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपची स्थिती चांगली आहे.  जिल्ह्यात भाजपकडे कार्यकर्त्यांचे किमान बळ आहे तसेच जिल्ह्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विणही बर्‍यापैकी घट्ट आहे. मात्र, पक्षाकडे तुलनेत सक्षम नेत्यांची कमतरता आहे. त्यामुळेच भाजपची स्थिती निवडणुकीआधी भक्‍कम करून सेनेला धोबीपछाड देण्याची तयारी भाजपने सुरू केली आहे.

येत्या निवडणुकांआधी भाजप या दोन्ही जिल्ह्यांत भक्‍कम करण्यासाठी पक्षातर्फे जोरदार प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. आता या लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी आमदार लाड यांच्याकडे देण्यात आल्यानंतर त्यांच्या संपर्क दौर्‍यावेळी भाजपमध्ये प्रवेशासाठी इच्छुक असलेल्या अनेकांनी लाड यांची भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे.

अन्य पक्षांतील नाराजीचा फायदा उचलणार

आमदार लाड यांनी लोकसभा मतदारसंघ निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर येत्या विधानसभा निवडणुकीत दोन्ही जिल्ह्यांतून आमदार भाजपचे विजयी होतील व येथील खासदारही भाजपचेच असतील, असा दावा केला आहे. येत्या काही महिन्यांत भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात अन्य पक्षातील नेत्या - कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश होण्याची शक्यता व्यक्‍त होत आहे. दुसरीकडे शिवसेना, राष्ट्रवादी कॉँग्रेसमधील नाराज भाजपमध्ये जाणार नाहीत, यासाठी त्या पक्षाच्या नेत्यांकडून प्रयत्न सुरू आहेत.