मालवण : वार्ताहर
गेल्या चार वर्षांत शिवसेनेकडून जिल्ह्याच्या आणि मालवण तालुक्याच्या विकासाबाबत अनेक आश्वासने देण्यात आली. मात्र, त्यातील एकही आश्वासन अद्याप पूर्ण झाले नाही. यामुळे ‘आश्वासने जोमात आणि जनता कोमात’ अशी परिस्थिती जिल्हाभरात आहे, अशी टीका महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे तालुकाध्यक्ष मंदार केणी यांनी केली.
माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, बाबा परब, नगरसेवक दीपक पाटकर आदी उपस्थित होते. श्री. केणी म्हणाले, लोकसभा निवडणूक जवळ आल्याने आता शिवसेनेला देवबागवासीयांची आठवण झाली आहे. देवबाग बंधारा आणि समस्या याकडे लक्ष देण्यासाठी गेल्या चार वर्षात पालकमंत्री आणि खासदारांना वेळ मिळाला नव्हता, यामुळे आता देवबाग दौ-यावर येण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. नारायण राणे यांनी यापूर्वी देवबाग, तळाशील, चिवलाबिच, राजकोट याठिकाणी बंधारे उभारताना कधीही पर्यावरण दाखल अगर सीआरझेडच्या अडचणी समोर दाखविल्या नाहीत.
मात्र, आ. वैभव नाईक वारंवार पर्यावरण आणि सीआरझेडचा बाऊ करत आहेत. सीआरझेडमध्ये शिथिलता आणल्याचा दावा आमदारांनी केल्याचे अनेक बँनर देवबाग, तारकर्लीमध्ये लावण्यात आले. मात्र प्रत्यक्षात शासनाने अशाप्रकारचे एकही आदेश दिलेला नसल्याचे उघड झाल्याने शिवसेनेच्या खोटारडेपणाचा कळस झाला आहे. दरवेळी ‘नवीन आश्वासन आणि नविन अंदाजपत्रक’ अशी नौटंकी शिवसेनेकडून सुरू असल्याची टीका श्री. केणी यांनी केली,
आरोग्य सेवा सक्षम करण्याची आश्वासने हवेतच विरली!
मालवण ग्रामीण रूग्णालयात वैद्यकीय अधिकारी व अत्यावश्यक सुविधा देण्याचे आश्वासन दीड वर्षापूर्वी बेळगाव येथील विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्या प्रसंगी पालकमंत्री, खासदार, आमदार यांनी दिले होते. लाईफ गार्डचीही नियुक्ती झालेली आहे. आजच्या परिस्थितीत ग्रामीण रुग्णालयात केवळ एक डॉक्टर 24 तास सेवा बजावत आहेत. अत्यावश्यक कोणतीही सुविधा रुग्णालयात नाही.
डॉक्टर आजारी पडला तर रुग्णालय बंद राहण्याची भीती आहे, रुग्ण बरे करण्यासाठी व्यवस्था न करता मृत्यूनंतर रूग्ण एसीत ठेवण्याची व्यवस्था करत आमदारांनी शीतपेटी उपलब्ध करून दिली आहे, असा उपरोधिक टोला श्री.केणी यांनी लगावला.
‘चांदा ते बांदा’ म्हणजे वार्यावरचा विकास!
‘चांदा ते बांदा’ योजना म्हणजे वार्यावरचा विकास आहे. यात फक्त जिल्ह्याचा नकाशा असून व त्या मध्ये पैशांचे आकडे दाखविले आहेत, अशी टीका श्री.केणी यांनी केली. दहशतवादाचा मुद्दा मांडून सत्तेत आलेल्या शिवसेनेने मच्छीमारांना आजपर्यंत फक्त खोटी आश्वासनेच दिली आहेत. यामुळे आता मच्छीमारांनीच दारावर मतांचा जोगवा मागण्यासाठी येणा-या शिवसेना पदाधिकार्यांना याचा जाब विचारावा, असे आवाहन श्री. केणी यांनी केले.