Sat, Jul 20, 2019 15:55होमपेज › Konkan › मान्सूनचे ‘लोकेशन’अद्याप माहीत नाही!

मान्सूनचे ‘लोकेशन’अद्याप माहीत नाही!

Published On: May 07 2018 11:39PM | Last Updated: May 07 2018 11:37PMसिंधुदुर्ग : गणेश जेठे

मे महिन्याचा पहिला आठवडा सरला, तरी मान्सूनची चाहूल अद्यापही लागलेली नाही. एवढेच कशाला, मान्सूनचे प्रवेशद्वार समजल्या जाणार्‍या अंदमान निकोबार बेटावरही मान्सूनच्या आगमनाची वर्दी अद्यापही आलेली नाही. 15 मेनंतरच मान्सून अंदमानला केव्हा येईल, याचा अंदाज बांधणे शक्य होईल, असे भारतीय हवामान खात्याचे निवृत्त शास्त्रज्ञ दिनेश मिश्रा यांनी म्हटले आहे. अंगातून घामाच्या धारा वाहत असल्याने ढगाळ वातावरण असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात वळिवाच्या पावसाच्या सरी केव्हा कोसळणार, याची प्रतीक्षा लागून राहिली आहे. 

हिंद महासागरामध्ये भूमध्य रेषेला क्रॉस करणारे वारे हिंद महासागरातून पुढे राजस्थानपर्यंत जातात. ते नैर्ऋत्य मोसमी वारे मान्सूनची निर्मिती करतात. ज्या मान्सूनवर भारत या महाकाय देशाची संस्कृती, अर्थव्यवस्था आणि जीवनशैली अवलंबून आहे, त्या मान्सूनच्या आगमनाबाबत म्हणूनच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अंदमान-निकोबार बेटांवर दरवर्षी सरासरी 20 मेच्या आसपास मान्सूनचे आगमन होते. गेल्या वर्षी 16 मे रोजी अंदमानमध्ये मान्सून धडकला होता. नंतर मात्र त्याची गती मंदावली होती. त्यामुळे अंदमानला लवकर मान्सून येऊनही कोकण किनार्‍यावर दाखल व्हायला त्याला एक जून उजाडला. यावर्षी पाऊस 97 टक्क्यांपेक्षा  अधिक होईल, असा अंदाज हवामान खात्याने यापूर्वीच व्यक्‍त केला आहे. मान्सूनला रोखणार्‍या आणि पेरू देशाच्या पश्‍चिम किनारपट्टीवर तयार होणार्‍या ‘अलनिनो’चा यावर्षी प्रभाव नाही ही एक आनंदाची बातमी आहे. त्यामुळे यंदा मान्सून संपूर्ण देशाला ओलाचिंब करेल, अशी आशा आहे. त्यामुळे यावर्षीच्या मान्सूनच्या आगमनाची वाट उत्सुकतेने पाहिली जात आहे. मान्सूनला गती देणारे वातावरण ऑस्ट्रेलियाच्या पश्‍चिमेला आणि झिंम्बॉब्वेच्या पूर्वेला असणार्‍या मादागास्कर हे या देशाच्या काहीसे पूर्वेकडून सुरू होते. तसे वातावरण अद्याप तयार न झाल्यामुळे अंदाज जाहीर केलेला नसावा, असे दिनेश मिश्रा यांनी म्हटले आहे. 

मान्सून अंदमानला केव्हा येईल, याचा अंदाज 15 मे नंतरच व्यक्‍त करता येणार आहे. बहुधा त्यानंतरच हवामान खाते अधिकृतरित्या मान्सूनच्या आगमनाची वर्दी देईल, अशी शक्यता आहे. तोवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ढगाळ वातावरण असल्याने मान्सूनपूर्व पावसाच्या सरी लवकरच कोसळतील, असा अंदाज जाणकार व्यक्‍त करत आहेत. 

Tags :Mansoon, Location, Information,