रत्नागिरी जिल्ह्यातून होणार आंबा वाहतूक

Last Updated: Mar 26 2020 8:54PM
Responsive image


रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा
आंबा बागायतदार, व्यावसायिकांना दिलासा मिळाला असून, आंबा वाहतुकीला जिल्हाधिकार्‍यांनी परवानगी दिली आहे. आंबा बागायतदारांनी संपर्क केल्यानंतर याची दखल भाजप नेते माजी खासदार नीलेश राणे यांनी घेऊन रत्नागिरी जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधला होता, तर  माजी आमदार बाळ माने यांनी अन्य शहरात आंबा विक्रीसाठी प्रयत्न सुरू केले होते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशामध्ये लॉकडाऊन झाले. संचार बंदी लागू झाली आणि दळणवळणाला मर्यादा आल्या. अनेक शंका आणि अडचणींचा सामना करावा लागला. त्याचवेळी आंबा फळ तयार होण्याचा हाच कालावधी असताना जिल्हा बंदी झाल्यानंतर तयार आंबा बाहेर कसा पाठवायचा या चिंतेने आंबा उत्पादक, बागायतदार धास्तावले. यंदाच्या मोसमात आंब्याच्या उत्पन्नाला ग्रहणच लागले आहे. यंदा म्हणावी तशी थंडी पडली नाही त्यामुळे हंगाम लांबला आहे. त्यात अळी आणि कीटकांच्या हल्ल्याची भीती बागायतदारांना होती. यासाठी अनेकांनी लाखो रुपये खर्च केले आहेत. अशावेळी उशिराने का होईना बागेत आंबा तयार झाला असताना तो विक्रीसाठी पाडव्याच्या मुहूर्तावर पाठवायच्या तयारीत बागायतदार, उत्पादक असताना मात्र कोरोनाचा संसर्ग पसरला आणि संपूर्ण जगच थबकून गेले आहे. देश या विषाणूच्या दहशतीखाली असून, देशात संचारबंदी लागू झाल्याने या तयार आंब्याचे करायचे काय हा प्रश्न बागायतदारांना पडला. याबाबत अनेक बागायतदारांनी माजी खासदार नीलेश राणे यांना संपर्क करून यातून मार्ग काढण्याची विनंती केली होती. राणे यांनी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांना याबाबत उपाययोजना करण्याचे आवाहन केले होते. जिल्हाधिकार्‍यांनी गुरुवारपासून आंबा परजिल्ह्यात जाण्याचा मार्ग मोकळा केला आहे. तालुका कृषी अधिकार्‍यांच्या माध्यमातून ही वाहतूक होणार आहे. यामुळे आता बागायतदारांची चिंता मिटणार आहे.