Sat, Jul 20, 2019 02:37होमपेज › Konkan › शॉर्टसर्किटमुळे विखारे-गोठणे येथे आंबा बागेचे नुकसान

शॉर्टसर्किटमुळे विखारे-गोठणे येथे आंबा बागेचे नुकसान

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

राजापूर : प्रतिनिधी

तालुक्यातील विखारे-गोठणे येथे शार्टसर्किटने लागलेल्या आगीत गवताच्या गंजी व आंबा बागेतील कलमे जळून शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. परिसरातील ग्रामस्थांनी तत्काळ धावाधाव करत आग नियंत्रणात आणल्याने मोठे नुकसान टळले. शनिवारी दुपारी ही घटना घडली.

विखारे-गोठणे येथील प्रभाकर वरक हे आपल्या शेळ्या घेऊन चरण्यासाठी काजरकाटा या ठिकाणी गेले असता त्यांना रानात आग लागल्याचे निदर्शनास आले. आग लागलेल्या ठिकाणाला लागूनच विखारे-गोठणे येथील शेतकर्‍यांच्या गवताच्या गंजी, उटी होत्या. तसेच आंबा, काजू कलमाच्या बागाही या ठिकाणी आहेत. त्यामुळे प्रसंगावधान राखत वरक यांनी गावात धाव घेत ग्रामस्थांना या घटनेबाबत माहिती दिली. त्यानंतर ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत. आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले.

तसेच राजापूर नगरपरिषदेच्या अग्‍नीशामक बंबालाही पाचारण करण्यात आले. त्यामुळे काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळविण्यात ग्रामस्थांना यश आले. मात्र, या आगीत अरूण सीताराम गुरव यांच्या गवताच्या गंजी जळून खाक झाल्या आहेत. तसेच भात साचवून ठेवलेली एक उटीही आगीच्या भक्ष्यस्थानी पडली असून गुरव यांचे मोठे नुकसान झाले आहे.

यामध्ये दत्ताराम बाबू खांबल व उमेश शांताराम खांबल यांच्या आंबा कलमाच्या बागेतील काही कलमे जळून नुकसान झाले आहे. ग्रामस्थांनी वेळेतच आग विझविल्याने बागेचे नुकसान टळले. आग विझविण्यासाठी आबासाहेब मराठे महाविाालयाच्या बागेत काम करणार्‍या कामगारांसह विकास झोरे, प्रभाकर वरक, संदीप बावकर, रमेश देवळेकर, मनीष देवळेकर, संतोष देवळेकर, दत्ताराम खांबल, वनीता वाडेकर, भाग्यश्री जोगले, अर्पणा गुरव, उमेश खांबल, अरूण गुरव आदींसह ग्रामस्थांनी मेहनत घेतली.