Fri, Jul 19, 2019 20:58होमपेज › Konkan › दुचाकीला आग; बागायती बेचिराख

दुचाकीला आग; बागायती बेचिराख

Published On: Dec 11 2017 1:30AM | Last Updated: Dec 10 2017 10:03PM

बुकमार्क करा

मालवण : प्रतिनिधी

दुचाकीत झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे लागलेली आग माळरानावर पसरल्याने आंबा कलम बाग आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.  मालवण तालुक्यातील ओझर-कातवड येथे ही घटना रविवारी दुपारी घडली. या आगीत कातवड येथील प्रकाश अनंत तोरसकर यांच्या दुचाकीसह त्यांच्याच मालकीच्या आंबा बागेसह लगतच्या साळसकर यांच्याही बागेतील आंबा व काजू कलमे जळाल्याने मोठे नुकसान झाले.

प्रकाश तोरसकर हे तीन दिवसांपूर्वीच बाहेर गावाहून आपल्या घरी आले होते. रविवारी दुपारी 12.30 वा. च्या  सुमारास ते आपल्या स्कूटरने मालवण येथे  जाऊन आले  व  त्यांनी दुचाकी घराच्या गेट समोर लावली. काही वेळाने त्यांना गाडीतून धूर येत असल्याचे दिसले.  यावेळी गाडी खोलण्यासाठी आवश्यक साहित्य आणण्यासाठी ते घरात गेले असता गाडीने पेट घेतला. गाडीला लागलेली ही आग लगतच्या गवताला लागून वार्‍यामुळे माळरानावर पसरली.  वाळलेले गवत व वारा यामुळे ही आग काही क्षणात भडकली व  जवळच असणार्‍या प्रकाश तोरसकर यांच्याच मालकीच्या आंबा बागेला कवेत घेतले. 

आगीने आंबा बागांना घेरल्याने तोरसकर, साळसकर व इतर ग्रामस्थांनी धावाधाव करून पाणी मारून आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र ग्रामस्थांचे प्रयत्न अपुरे पडले. मालवण नगरपालिकेच्या अग्निशमन बंबाला पाचारण करण्यात आले. बंब दाखल झाल्यानंतर ही आग विझविण्यात आली. मात्र, या आगीमुळे तोरसेकर व साळसकर यांची आंबा कलमे जळून मोठे नुकसान झाले. काही दिवसांपूर्वी वादळी पावसामुळे आंबा कलमांचे नुकसान झाल्याने तोरसकर व साळसकर हे  चिंतातुर असताना आता आंबा कलमे अचानक लागलेल्या आगीमुळे जळून गेल्याने त्यांच्यावर मोठे संकट ओढवले आहे.