Tue, Jul 23, 2019 16:44होमपेज › Konkan › ‘अवकाळी’मुळे आंब्याला फटका

‘अवकाळी’मुळे आंब्याला फटका

Published On: May 12 2018 1:29AM | Last Updated: May 11 2018 10:31PMरत्नागिरी : प्रतिनिधी

कोकणात ओखी वादळानंतर उद्भवलेल्या प्रतिकूल हवामानाने झालेल्या अवकाळी पावसाने आंबा उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्याचबरोबर फळाच्या गुणवत्तेवरही परिणाम झाला असून यावर्षीही आंबा नुकसानीचा धोका आहे. सरत्या वर्षात सुरू झालेल्या या अवकाळीने पूर्ण आंबा हंगाम व्यापला असून आता या नुकसानीचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हा कृषी अधीक्षक एस. एस. जगताप यांनी दिल्या आहेेत. 

दोन वर्षांपूर्वी  कोकणात अवकाळी पावसाने  आंबा नुकसान  झाले होते. त्यानंतर शासनाने कोकणात आंबा नुकसानभरपाई जाहीर केली होती.  कोकणातील भौगोलिक स्थिती आणि सातबारावरची स्थिती यामध्ये अनंत तांत्रिक अडचणींमुळे ही भरपाई बागायतदार आणि उत्पादकांपर्यंत पोहोचण्यात दमछाक झाली. अद्यापही ही भरपाई कागदावर रेंगाळत आहे. आता पुन्हा एकदा प्रतिकूल वातावरणामुळे कोकणातील आंब्याचे 40 टक्के  उत्पादन घटण्याची भीती आहे. तसेच जानेवारी आणि  फेब्रुवारीत झालेल्या अवकाळी पावसाने फळगळती झाली. त्यामुळे उत्पादनावरही परिणाम झाला.  मार्च-एप्रिल महिन्यातही अवकाळी आणि वातावरणातील बदलाने आंब्यावर अनेक भागात फुलकिडीचा आणि बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला. 

आता आंब्याच्या अंतिम टप्प्यातही अवकाळीचा शिडकावा

झाल्याने हाती आलेल्या उत्पादनाला फटका बसण्याची भीती बागायतदारांनी व्यक्त  केली आहे. गेल्या पाच महिन्यांत झालेल्या वातावरणातील बदलाने आंबा उत्पादनाच्या  महत्त्वाच्या टप्प्यावर  अवकाळीने खो घातल्याने अनेक भागात आंब्याचे नुकसान झाले  आहे. मात्र, अद्याप त्याची मोजदाद न झाल्याने कागदोपत्री  नुकसान रेकॉर्डवर आलेले नाही. याबाबत आता कृषी विभागाकडून  सर्वेक्षण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे यावर्षी  आंबा नुकसानीचा दुसरा अंक सुरू होण्याची शक्यता आहे. गतवर्षाप्रमाणे तोही दीर्घकाळ  लांबण्याची भीती बागायतदारांनी वर्तविली आहे.

दर मिळविण्यास कसरत करावी लागणार

डिसेंबरमध्ये आंबा हंगामला सुरुवात होते. मात्र, डिसेंबर 2017 मध्ये ओखीनंतर जिल्ह्यातील वातावरणात झालेले बदल आंबा हंगामाच्या प्रत्येक टप्प्यावर हानिकारक ठरले आहे. जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये झालेल्या अवकाळीने फळगळती झाली. त्यानंतर पुनर्मोहरामुळे आंबा हंगाम लाबण्याची भीती होती. त्यानंतरही अवकाळीने पाठलाग केल्याने आंब्याच्या उत्पादनावरच परिणाम झाला आहे. आता शेवटच्या टप्प्यातही अवकाळीने गाठल्याने आंब्याच्या दर्जावर परिणाम होत असल्याने बाजारपेठेत चाललेल्या या फळाला दर मिळविण्यासाठी  उत्पादकांना कसरत करावी लागत असल्याचे मत टिके येथील आंबा बागायतदार संजय पवार आणि अनिरुद्ध साळवी यांनी दिली.