Wed, Apr 24, 2019 15:31होमपेज › Konkan › यंदा आंबा हंगामाला विलंब

यंदा आंबा हंगामाला विलंब

Published On: Feb 10 2018 1:32AM | Last Updated: Feb 09 2018 10:52PMरत्नागिरी ः प्रतिनिधी

गेले आठवडाभर असलेल्या मळभी वातावरणाने  आंबा हंगामावर परिणाम होणार आहे. आधीच अनिश्‍चित वातावरणाने अडचणीत आलेला आंबा हंगाम नव्या संकटामुळे उशिरा सुरू होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम दरावर होण्याची भीती रत्नागिरीतील बागायतदारांनी व्यक्‍त केली आहे. 

यंदाच्या हंगामात हापूस आंबा थोडासा उशिरा भरास येईल, त्याचा दरही तुलनेने कमी असेल. ओखी वादळामुळे सुरुवातीस विलंब व एकदम तयार झाल्याने किमतीत कमी असा प्रकार होण्याची शक्यता बागायतदारांनी  व्यक्‍त केला आहे. 

ओखी चक्रीवादळामुळे देशाच्या पश्‍चिम किनार्‍यावरील हापूस आंबा कलमांवर परिणाम झाला आहे. अन्य राज्यांतही त्याचा परिणाम होऊ लागल्याने मुंबई या प्रमुख बाजारपेठेत येथील आंबा दाखल होण्यातही उशीर होत आहे. कोकणातून आंबा बाजारात येण्याची सुरुवात झाली आहे. ते प्रमाण तुरळक आहे. 

फेब्रुवारीमध्ये पुन्हा आंब्याला मळभी वातावरणाने  अडथळे  आणले आहेत. त्यामुळे मार्चमध्ये बाजारात येणारा आंबा एक महिना उशिरा दाखल होण्याची चिन्हे आहेत. एप्रिलमध्ये आंबा मोठ्या प्रमाणात बाजारात येईल आणि मे महिन्यात हापूस आंब्याचा सर्व हंगाम संपेल, अशी माहिती येथील आंबा बागायतदारांनी दिली. यामुळे  यावर्षी हापूस आंब्याचा हंगाम दरवर्षीपेक्षा लांबणार नसून तो मर्यादित राहील. त्यामुळे एप्रिलमध्ये एकत्र उत्पादन हाती येत असल्याने बाजारपेठेत आंब्याची आवक वाढलेली असेल. त्याचा परिणाम दरावर होणार असून या हंगामात आंब्याचा दर काहीसा खाली राहण्याची भीती  बागायतदारांनी व्यक्‍त केली. 

यावर्षी वेळेवर कलमे मोहरण्यास उशीर झाला आहे. ऑक्टोबर व नोव्हेंबरमध्ये पहिला मोहर दिसून आला. मोहरानंतर 110 दिवसांनी फळ काढण्यास तयार होते. अद्याप अनेक ठिकाणी फळधारणा दिसून येत नाही. एप्रिलच्या पुढे फळे उपलब्ध होतील. ते ही हवामान चांगले असेल तरच! याशिवाय गळतीतून फळे बचावली तर अपेक्षित उत्पन्‍न येईल. दरवर्षी आंब्याचे घाऊक विक्रेते हंगामाचा अंदाज बांधतात आणि मागणी लक्षात घेऊन दर ठरवत असतात.