Wed, Apr 24, 2019 00:09होमपेज › Konkan › दापोली मतदारसंघ पुत्रप्रेमात अडकला

दापोली मतदारसंघ पुत्रप्रेमात अडकला

Published On: Jan 03 2018 1:13AM | Last Updated: Jan 02 2018 8:39PM

बुकमार्क करा
मंडणगड : प्रतिनिधी  

शिवसेनेमध्ये जुन्या कार्यकर्त्यांना बाजूला सारून व शिवसैनिकांचा केवळ वापर करून दापोली- मंडणगड विधानसभा मतदारसंघ विकासापेक्षा पुत्रप्रेमातच अधिक अडकला असल्याचा घणाघाती हल्ला माजी खासदार निलेश राणे यांनी मंडणगड येथे ना. रामदास कदम यांचे नाव न घेता केला. मंडणगड येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष हा

विकासापासून वंचित असलेल्या जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी एक समर्थ पर्याय ठरेल, असा विश्‍वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. राणे यांनी सांगितले की, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची बांधणी संपूर्ण महाराष्ट्रात केली जात आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील पाचही विधानसभा  मतदारसंघ बांधणीचे काम हाती घेण्यात आले आहे. पक्षाचे नेते नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील गोरगरीब, शोषित, बेरोजगार, शेतकरी व कष्टकर्‍यांच्या समस्या जाणून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी स्वाभिमान पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे राणे यांनी सांगितले. 

सध्या दापोली-मंडणगड विधानसभा मतदारसंघातील एका काळातील जुने जाणते ज्यांनी शिवसेनेसाठी आपले रक्त आटवले, त्यांना बाजूला करून केवळ आपल्या पुत्रासाठीच सगळं काही सुरु आहे. येथे विकासावर कुठलेही चर्चा नसून पुढचा आमदार कोण होणार?, उमेदवार कोण? या  चर्चेत राजकीय पक्ष गुंतले आहेत, अशा विचित्र राजकीय परिस्थितीत दापोली विधानसभा मतदारसंघ अडकला आहे.  मतदारसंघात पर्यटनाला कोणतीही चालना दिली गेलेली नाही. बेरोजगार युवक-युवतींना रोजगारी देणारी कोणतेही योजना नसल्यामुळे अशा लोकांच्या हाताला काम देण्यात इथले लोकप्रतिनिधी कमी पडल्याने पर्यायाने त्यांच्याकडे कोणतेच व्हिजन नसल्याने हा संपूर्ण मतदारसंघ निराशेच्या गर्तेत अडकला आहे.आम्हाला राजकारणातून कोणताही बिझनेस करायचा नाही, असा उपरोधिक टोलाही माजी खा.निलेश राणे यांनी लगावला.

शिवसेनेचे केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्यावर जोरदार हल्ला करताना राणे म्हणाले की,अनंत गीते यांनी कुणबी समाजाचा केवळ मतांसाठी वापर करून घेतला. मात्र, या समाजाच्या समस्या कोणत्या हे जाणणे त्यांनी टाळले.त्यांच्या 30 वर्षांच्या काळात त्यांनी या समाजासाठी कोणतेही काम केलेले नाही. एखादा प्रकल्प आणण्यातही गीते अपयशी ठरले आहेत. एकाही मुलाच्या हाताला रोजगार मिळवून देण्यात त्यांना का जमलेले नाही ? असा सवाल करीत अशा नेत्यांच्या अकार्यक्षमतेमुळे जनता विकासापासून शेकडो मैल दूर गेली आहे, हे सत्य मात्र कदापी विसरता येणार नाही. यावेळी  हाराष्ट्र  स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण आग्रेकर,राजन देसाई,मंगेश शिंदे, मेघना शिंदे, अजय साळवी,परिमल भोसले आदी मान्यवर उपस्थित  होते.