Tue, May 21, 2019 12:28होमपेज › Konkan › सिलिंडर स्फोटात घर भस्मसात

सिलिंडर स्फोटात घर भस्मसात

Published On: Jun 20 2018 10:34PM | Last Updated: Jun 20 2018 10:32PMमंडणगड : प्रतिनिधी

तालुक्यातील वेसवी मोहल्ला येथे मंगळवारी (दि. 19) रात्री सिलिंडरचा स्फोट झाल्याने लागलेल्या आगीत एक घर भस्मसात झाले. या स्फोटात चौघेजण गंभीर, तर तिघेजण किरकोळ जखमी झाले असून, घराचे सुमारे पन्नास लाखांचे नुकसान झाले आहे. 

या घटनेसंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, वेसवी येथील मन्सुर अहमदहुसैन लांबे (वय 55) यांच्या घरात मंगळवारी रात्री 9.30 वा. त्यांची पत्नी आरिफा मन्सुर लांबे (45) या किचनमध्ये गॅसवर दूध गरम करीत होत्या. यावेळी शेगडी व गॅसची टाकी यांना जोडणार्‍या पाईपने अचानक पेट घेतला. त्यामुळे त्यांनी आरडाओरडा केला. यावेळी घरातील सदस्य व बाहेर बसलेली माणसे घाबरली त्यांनी घरातील लहान मुले व महिलांना  प्रथम घराबाहेर काढून सुरक्षित स्थळी हलवण्यात आले.

दरम्यान, पाईप पेटल्याने सिलिंडरच्या टाकीचाही स्फोट होऊन मोठा आवाज झाला व घरात आग भडकली. यावेळी घरातील इन्व्हर्टरनेही पेट घेतल्याने जावेद मुल्ला, दिलदार लांबे, रईस मरणे, मझहर बेंडुर, मन्सूर लांबे, खलिल लांबे, मोहीब लांबे हे जखमी झाले. सिलिंडर स्फोटाच्या आवाजाने वेसवी व बाणकोट परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.
या आगीत घर जळून पूर्णतः खाक झाले घरातील अन्नधान्य, कपडालत्ता, भांडीकुंडी, साठ तोळे सोने, चांदीचे दागदागिने जळल्याने सुमारे अठरा लाखांचे नुकसान झाले.  सव्वा पाच लाखांची रोकड, पाच फ्रीज, इनव्हर्टर, वॉशिंग मशीन, टी. व्ही., सोफा, लाकडी फर्निचर, जळून नष्ट झाल्याने सुमारे 50 लाखांचे नुकसान झाल्याची माहिती  तलाठी पाटील यांनी अपघातानंतर बुधवार 20 रोजी केलेल्या पंचनाम्यात नमूद केली आहे.  

दरम्यान, सिलिंडर स्फोटाचा आवाज एवढा मोठा होता की, या आवाजाने खाडीपलीकडील बागमांडला या गावातील ग्रामस्थांनीही वेसवीकडे धाव घेतली. दहा ते पंधरा मिनिटांच्या कालावधीतच आगीने रौद्ररुप धारण केले. मंडणगड तालुक्यात अग्निशमन बंब नसल्याने दापोली, खेड व श्रीवर्धन तालुक्यांतील अग्नीशामक बंबाला पाचारण करण्यात आले.  तोपर्यंत ग्रामस्थांनी हंडे, टाक्या व  पिंपाच्या साहाय्याने पाणी ओतून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. यानंतरही आग आटोक्यात येत नव्हती. त्यामुळे नळपाणी योजनेच्या पाण्याच्या लाईनवरुन पाणी घेत ते फवारणी यंत्राच्या साहाय्याने मारण्यात येत होते. सुमारे एक तासानंतर श्रीवर्धन येथील बंब घटनास्थळी पोहोचला. यानंतर दोन ते तीन तासांच्या अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. 

मदतकार्यात बाणकोट सागरी पोलिस ठाण्याच्या कर्मचार्‍यांनी सहभाग घेतला. दरम्यान, घरातील तीन माणसे, मदतकार्यात सहभागी झालेल्या चार अशा सात जखमींना उपचारासाठी रूग्णालयात हलविण्यात आले. त्यातील काहींना मुंबईत नेण्यात आले आहे.