Wed, Mar 20, 2019 02:36होमपेज › Konkan › बाणकोट-बागमांडला सी-लिंक ५ वर्षे रखडलेलाच

बाणकोट-बागमांडला सी-लिंक ५ वर्षे रखडलेलाच

Published On: Aug 29 2018 1:29AM | Last Updated: Aug 28 2018 11:28PMमंडणगड : विनोद पवार

वरळी सी-लिंक प्रमाणेच कोकणातील महत्त्वाकांशी प्रकल्प असलेल्या बाणकोट-बागमांडला सागरी सेतूचे काम सध्या रखडले आहे.  सन 2013 साली आघाडी सरकारच्या काळात सुरु करण्यात आलेल्या पुलाचे काम सन 2015 सालापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, आजही पुलाचे काम अपूर्ण असल्याने येथील स्थानिकांमध्ये अनेक प्रश्‍न उपस्थित होत आहेत. 

या सागरी सेतूमुळे दळणवळणात सुलभता येणार असून येथील स्थानिक क्षेत्रात पर्यटनात वाढ होण्यासमदत मिळणार  असल्याने रोजगारात वाढ होऊ शकते. त्यामुळे पुलाचे काम लवकरच मार्गी लागणे अपेक्षित आहे.

रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धनमधील बागमांडला आणि रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड येथील बाणकोट या दरम्यान खाडीवर वरळी सी लिंकप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे महत्त्वाकांक्षी सागरी सेतू बांधण्याचे काम सन 2013 पासून सुरु करण्यात आले. पुलाची लांबी जोडरस्त्यासह 1800 मीटर इतकी असून रुंदी 12.50 मीटर इतकी आहे. पुलाच्या मध्यवर्ती गाळ्यांचे काम वरळी सी-लिंक प्रमाणे ‘केबल स्टे’या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असल्याने हा सागरी पूल पर्यटकांसाठी आकर्षण तर ठरणार आहेच शिवाय दळणवळणासाठी अधिक उपयुक्त ठरणार आहे. कोकण किनारपट्टीलगत सागरी महामार्ग आहे. मात्र, अनेक ठिकाणी आवश्यकतेनुसार पुलाची उपलब्धता नसल्याने वाहतूक राष्ट्रीय महामार्ग क्र. 67 वरून होते. त्याचा परिणाम मुंबई-गोवा महामार्गावर होतो. वाहतुकीचा बोजा वाढून या महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या पुलामुळे मुंबई - गोवा महामार्गावरील वाहतूक सुलभ होणार आहे. 

दरम्यान, काम अपूर्ण अवस्थेत असल्यामागाचे कोणतेही कारण प्रशासकीय पातळीवरून अद्यापही स्पष्ट झालेले नाही. पुलाचे पिलर्स उभे झाले असले तरी अजूनही बरेच काम करायचे बाकी आहे. शिवाय पुलावरून येणारा मार्ग वेळास येथून मुख्य मार्गाला वेळास गाव मध्ये असल्याने कशा पद्धतीने जोडणार की गावाला वगळून मार्ग काढणार याबाबत स्पष्टता झालेली नाही. या सागरी सेतूमुळे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने वेळास येथे भविष्यातील पर्यटकांचा वाढणारा ओघ लक्षात घेऊन नियोजित केलेला पर्यटन केंद्र निर्मितीचा प्रकल्प पुलाच्या अर्धवट कामामुळे बारगळला आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्च करून देखील अपूर्ण असलेल्या पुलाच्या कामाने येथील नागरिकांमध्ये संताप व्यक्त होताना दिसत आहे.