Thu, Apr 25, 2019 03:37होमपेज › Konkan › नव्या वर्षाच्या स्वागतासाठी मालवणनगरी सज्ज!

नव्या वर्षाच्या स्वागतासाठी मालवणनगरी सज्ज!

Published On: Dec 17 2017 1:28AM | Last Updated: Dec 16 2017 9:08PM

बुकमार्क करा

मालवण : वार्ताहर 

सरत्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाच्या स्वागताचे सेलिब्रेशन करण्यासाठी पर्यटकांनी मालवण किनारपट्टीला आपली  सर्वाधिक पसंती दिली आहे. पर्यटन महामंडळाची तारकर्ली एमटीडीसी 5 जानेवारीपर्यंत आगाऊ बुकिंगसह फुल झाली आहे. तारकर्ली, देवबाग, वायरी, दांडी चिवला व तळाशील-तोंडवळी किनारपट्टीवरील हॉटेलमध्येही पर्यटकांनी आगाऊ बुकिंग सुरू केले आहे. दरम्यान सागरी पर्यटनाबरोबर येथील कृषी व धार्मिक पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी येणार्‍या पर्यटकांच्या स्वागतासाठी मालवणनगरी  सज्ज झाली आहे.

कोकण किनारपट्टीवरील पर्यटनाचे प्रमुख केंद्र म्हणून मालवणला पर्यटकांकडून सर्वाधिक पसंती दिली जाते. लाखोंच्या संख्येने मालवणात येणार्‍या पर्यटकांची संख्या दरवर्षी वाढतच आहे. राज्याबरोबर देशाच्या कानाकोपर्‍यातून तसेच विदेशातूनही मोठ्या संख्येने पर्यटक येत आहेत. पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेता हॉटेलची संख्याही मालवणात मोठ्या प्रमाणात वाढत असून पर्यटकांना चांगली सुविधा देण्यासाठी येथील पर्यटन व्यावसायिकांनी पुढाकार घेतला आहे. सीआरझेड कायद्यामुळे किनारपट्टी भागात बांधकामांवर येणारे निर्बंध लक्षात घेता ’उडन हाऊस’ या संकल्पनेतून अत्याधुनिक सोई सुविधायुक्त अश्या पर्यटन हाऊसची उभारणीही अनेकांनी केली आहे. तर अनेकांनी आपल्या हॉटेलमध्ये दर्जेदार सुविधा देण्यावर भर दिला आहे. त्याबरोबर वॉटरस्पोर्ट्स, पॅरासेलिंग, बोटिंग व स्कुबाडायविंग याला पर्यटकांची सर्वाधिक पसंती आहे.

पर्यटननगरी 5 पर्यंत फुल्ल...!

तारकर्ली एमटीडीसी 17 डिसेंबर ते 5 जानेवारी या कालावधीत फुल झाली आहे. येथील 22 तंबू निवास व कर्ली खाडीतील दोन हाऊसबोट यांचा यात समावेश आहे. अनेक हॉटेल मध्ये आगाऊ बुकिंगची नोंद सुरू आहे. काही ठिकाणी पर्यटकांना विशेष पॅकेज दिली जात आहेत. ऑनलाईन पद्धतीने बुकिंग करुन आगाऊ रक्कमही पर्यटकांकडून जमा केली जात आहे. 

मालवण पोलिस निरीक्षक अरविंद बोडके यांनी पर्यटन हंगामात शहरातील प्रमुख रस्त्यावर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक दिक्षितकुमार गेडाम यांच्याकडे जादा पोलीस कुमक देण्याची मागणी केली आहे. प्रमुख मार्गावर वाहतूक पोलिस तैनात केले जाणार आहेत. 

वॉटरपार्कही सेवेत दाखल...!

किल्ले सिंधुदुर्गच्या अगदी समोर साकारलेले दांडी बीच सी वॉटर पार्क रविवार पासून पर्यटकांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहे. महाराष्ट्र किनारपट्टीवर उभारणी झालेल्या या पहिल्या वॉटरपार्कचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांसोबत बच्चेकंपनी आतुर असल्याचे चित्र आहे.