Mon, Jul 22, 2019 02:38होमपेज › Konkan › दूरसंचार अभियंत्यांना शिवसैनिकांचा घेराव!

दूरसंचार अभियंत्यांना शिवसैनिकांचा घेराव!

Published On: Jan 04 2018 1:01AM | Last Updated: Jan 03 2018 9:01PM

बुकमार्क करा
मालवण : वार्ताहर 

रत्नागिरी - सिंधुदुर्गात  मोठ्या प्रमाणात बीएसएनएलचे ग्राहक आहेत मात्र अन्य खासगी कंपन्यांना प्रोत्साहन देण्यासाठी बीएसएनएलकडून ग्राहकांची पिळवणूक सुरू असल्याचा आरोप करत बुधवारी शिवसेना पदाधिकार्‍यांनी बीएसएनएलचे अधिकारी एस. आर. कसबे यांना घेराव घातला. कारभार असाच अनागोंदी सुरू राहिल्यास बीएसएनएल कार्यालयास टाळे ठोकू, असा इशारा संतप्त शिवसेना पदाधिकार्‍यांनी यावेळी दिला. बीएसएनएलचे अधिकारी एस. आर. भिसे हे गुरुवारी या समस्येवर तोडगा काढणार असल्याचे आश्वासन अधिकार्‍यांनी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांना यावेळी दिले. 

गेले दोन महिने मालवण शहरासह तालुक्यातील बीएसएनएल सेवेचा बोजवारा उडाला आहे. याप्रश्नी दूरसंचार अधिकार्‍यांचे वारंवार लक्ष वेधूनही  सेवेत सुधारणा झालेली नाही. त्यामुळे संतप्त शिवसेना पदाधिकार्‍यांनी बुधवारी येथील दूरसंचारच्या कार्यालयात जात अधिकार्‍यांना घेराओ घातला.  नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, नगरसेवक नितीन वाळके, पंकज सादये, तृप्ती मयेकर, सुनीता जाधव, आकांक्षा शिरपुटे, बाबी जोगी, किरण वाळके, महेंद्र म्हाडगुत, अंजना सामंत, बाबू मांजरेकर, दीपा शिंदे, यशवंत गावकर, किशोर गावकर, दीपक मयेकर, तुळशीदास मयेकर, तपस्वी मयेकर आदी उपस्थित होते.

यावेळी शिवसेना पदाधिकार्‍यांनी बीएसएनएलच्या अनागोंदी कारभाराचा पाढा वाचला. सिंधुदुर्गात बीएसएनएलचे मोठ्याप्रमाणात ग्राहक आहेत.मात्र   कंपनी ग्राहकांना सुरळीत सेवा न देता अन्य खासगी कंपन्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा आरोप शिवसैनिकांनी यावेळी केला. कॉल ड्रॉपच्या समस्येने नागरिक हैराण झाले आहेत. अन्य मोबाईल कंपन्यांची सेवा व्यवस्थित सुरू असताना केवळ  बीएसएनला कोणती समस्या आहे? असा प्रश्न  या पदाधिकार्‍यांनी  केला. पालकमंत्री दीपक केसरकर, आ. वैभव नाईक यांच्यासमोर बीएसएनएलच्या अधिकार्‍यांनी समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले होते. परंतु अद्यापही बीएसएनएलच्या कारभारात सुधारणा झालेली नाही. याचा अर्थ बीएसएनएलचे अधिकारी आमदार, खासदारांनाही दाद देत नाहीत, असा आरोप  शिवसेना पदाधिकार्‍यांनी  केला.  नितीन वाळके, दीपक मयेकर, महेंद्र म्हाडगुत यांनीही बीएसएलएलच्या समस्या मांडल्या.