Wed, Apr 24, 2019 07:40होमपेज › Konkan › पोलिसांकडून आई व मुलाला बेदम मारहाण

पोलिसांकडून आई व मुलाला बेदम मारहाण

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मालवण : प्रतिनिधी 

पोलिसात कोणतीही तक्रार दाखल नसताना मालवण पोलिसांनी गुरूवारी रात्री 10.15 वाजता कातवड आनंदव्हाळ येथ्ील सचिन राजाराम घाडीगावकर (36) याला व त्याच्या आईला मारहाण केली. याप्रकरणी घाडीगावकर कुटुंबियांनी थेट जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे दाद मागितली आहे. या मारहाणीमुळे  घाडीगावकर कुटुंबीय प्रचंड मानसिक दडपणाखाली आले आहे. या मारहाणीत सहभागी  चारही पोलिसांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी घाडीगावकर यांनी केली आहे.

दरम्यान, मालवणचे पोलिस निरीक्षक अरविंद बोडके हे सुट्टीवर असल्याने प्रभारी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक बालाजी सवंडकर यांच्याशी संपर्क साधला असात त्यांनी गुरूवारी रात्री गाडी अंगावर घालण्यात आल्याची कोणतीही तक्रार नोंदविली नसल्याचे स्पष्ट केले. तसेच घाडीगावकर यांना झालेल्या मारहाणीबाबत आपल्याकडे कोणतीही तक्रार आलेली नसल्याचे सांगितले.

सचिन घाडीगावकर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केलेल्या तक्रारीत असे म्हटले आहे, 29 मार्च रोजी रात्री10.15 ते 10.30 वा. च्या दरम्याने मी कुटुंबीयांसोबत घरात होतो. त्यावेळी कंपाऊंडच्या बाहेर पोलिसांची गाडी येऊन थांबली आणि त्यातून चार पोलिस खाली उतरले. त्यांनी आणलेल्या बोलेरो गाडीवर पोलिस असे स्पष्टपणे लिहिलेले होते.  पोलीसांची गाडी येऊन थांबल्यावर साळकुंभा येथील मांजरेकर नावाची व्यक्‍ती मोटारसायकलने तेथे आली. त्यानंतर ते पाचही जण माझे कंपाऊंडमध्ये घुसले. त्यावेळी मी  घराच्या बाहेर दरवाजाजवळ अंगणात बसलो होतो. मांजरेकर याने माझ्याकडे बोट दाखवून, याने अंगावर गाडी घातली असे पोलिसांना सांगितले.  

त्यानंतर  एकाने पोलिसाने माझ्या शर्टाच्या कॉलरला पकडून मला वर उचलले आणि चल गाडीत बस, तुला आतमध्ये घेतो आणि पोलिस काय चीज आहे हे दाखवितो. असे मोठ्याने ओरडून सांगू लागला. त्याचवेळी  दुसर्‍या पोलिसाने बांबु उचलून माझ्या पायावर तडाखे द्यायला सुरूवात केली. मी ओरडायला लागलो. ते ऐकून माझी आई  धावत बाहेर आली. तिने पोलिसांच्या मारहाणीपासून माझा बचाव करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलीसांच्या बांबूचा एक फटका माझ्या आईच्या कमरेवर देखील बसलेला आहे. त्यावेळी ती मोठ्याने विव्हळली.

त्यानंतर त्या पोलिसांपैकी एकाने मला ओढत गाडीकडे नेण्याचा प्रयत्न केला असता मी त्यांना, माझा गुन्हा काय आहे? तो सांगा, माझ्याविरूद्ध तक्रार दाखल झाली आहे काय? असल्यास ते मला दाखवा. अशी त्यांच्याकडे विचारणा केली. त्यावेळी पोलिसांनी माझी धरलेली शर्टाची कालर सोडून दिली आणि मोबाईलवर माझा फोटो काढून घेतला आणि तुला तक्रार कशी लिहून घ्यायची ती दाखवितो, आम्हाला कायदा शिकवतोस काय? असे म्हणून ते सर्वजण तेथून निघून गेले. या सर्व प्रकारामुळे मी व माझी आई अत्यंत भयभीत झालो होतो. पोलिसांचे हे कृत्य अत्यंत गुन्हेगारी स्वरूपाचे आहे. या प्रकरणामध्ये मला न्याय मिळाला पाहिजे, असे सांगितले आहे.
 

 

tags ; Malvan,news,police, beat, up mother,child,


  •