Thu, Jul 18, 2019 12:53होमपेज › Konkan › बोगस सातबारा बनवून जमीन बळकविण्याचा प्रयत्न

बोगस सातबारा बनवून जमीन बळकविण्याचा प्रयत्न

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मालवण : प्रतिनिधी

आनंदव्हाळ येथील गुरुनाथ विष्णू भगत व सौ. सुषमा गुरुनाथ भगत या दांपत्याला जमिनीच्या वादातून गावातीलच एक व्यक्ती गेली दोन वर्षे त्रास देत आहे. त्या व्यक्तीने बोगस सातबारा बनवला असून आपली जमीन बळकविण्याचा प्रयत्न त्या व्यक्तीकडून होत असल्याचा आरोप भगत यांनी केला आहे.  काही दिवसांपूर्वी त्या व्यक्तीने गुरुनाथ भगत यांना मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली आहे. याबाबत भगत यांनी मालवण पोलिस स्थानकात वारंवार खबर दिली असून जिल्हा पोलिस अधीक्षकांचेही लक्ष वेधले आहे. मात्र, पोलिसांकडून योग्य ती कारवाई केली जात नसल्याचा आरोप भगत दांपत्याने केला आहे.

 गुरुनाथ भगत यांची 14 गुंठे जमीन आहे. मात्र, त्यांच्या घरापासून काही अंतरावर राहणार्‍या एका व्यक्तीने भगत यांच्या जागेचा बोगस सातबारा बनवून जमिनीवर आपला हक्क सांगत गेली दोन वर्षे भगत दांपत्याला त्रास देत आहे. त्या व्यक्तीने तलाठी व पोलिसपाटील यांच्या साथीने बनावट सातबारा बनविला असल्याचा आरोप भगत व त्यांच्या बहीण प्रमिला मांजरेकर यांनी केला आहे.या वादातून त्या व्यक्तीने गुरुनाथ भगत यांना मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली आहे. याबाबत भगत यांनी मालवण पोलिसांकडे वारंवार व्यथा मांडत लक्ष वेधले. मात्र, याबाबत कोणतीही कारवाई होत नसल्याने भगत यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांचे लक्ष वेधले आहे.