Tue, May 21, 2019 00:05होमपेज › Konkan › कालावल खाडीपात्रातील बेटांचा अस्तित्वासाठी संघर्ष!

कालावल खाडीपात्रातील बेटांचा अस्तित्वासाठी संघर्ष!

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मालवण ; महेश कदम 

मालवण तालुक्यातील कालावल खाडीपात्रात निसर्गाची देणे लाभलेली अनेक बेटे आहेत. एखाद्या जागतिक पर्यटन स्थळालाही हेवा वाटावा अशा स्वरूपात वसलेल्या या नैसर्गिक बेटांची सध्या मोठ्या प्रमाणात धूप झाली आहे. पावसाळ्यात उद्भवणार्‍या पूर परिस्थितीचा फटका या बेटांना बसत असून गेली काही वर्षे या बेटांचा अस्तित्वाशी संघर्ष सुरू आहे. दरम्यान, येथील ग्रामस्थांच्या गेली अनेक वर्षांच्या सततच्या पाठपुराव्यांनंतर मसुरकर जुवा व खोत जुवा बेटांना सुमारे अडीज कोटींचे दोन धूपप्रतिबंधक बंधारे वर्षभरापूर्वी मंजूर झाले. मात्र, पर्यावरण रक्षणासाठी मंजूर झालेले बंधारे पर्यावरण खात्याच्याच मंजुरीत रखडले आहेत. त्यामुळे शासनाच्या या कारभाराबाबत स्थानिक ग्रामस्थांतून तीव्र संताप व्यक्‍त होत आहे. 

कालावल खाडीपात्रात मसुरकर जुवा, खोत जुवा, सावंत जुवा, परुळेकर जुवा, सय्यद जुवा ही बेटे अस्तित्वात आहेत. यातील 900 मीटरचा घेर असलेल्या मसुरकर जुवा बेट व अडीज हजार मीटर घेर असलेल्या खोत जुवा बेटावर गेली काही पिढ्या लोकांचे वास्तव्य आहे. मसुरकर बेटावर दर तीन वर्षांनी होणार्‍या भवानी मातेच्या उत्सवात हजारो भाविक सहभागी होतात. या दोन्ही बेटांवर सध्या 100 हून अधिक लोकवस्ती आहे. मसुरकर जुवा बेटावर सध्या तीन कुटुंबे वास्तव्यास आहेत तर खोत जुवा बेटावर तीस कुटुंबे वास्तव्यास आहेत. माड बागायती हेच तेथील लोकांचे उपजीविकेचे साधन आहे. गेली तीन ते चार पिढ्या या बेटांवर लोकांचे वास्तव्य आहे. मुलांच्या शाळा, रोजगार याचा विचार करता काही कुटुंबांनी बेटाबाहेर स्थलांतर केले आहे. बेटावरील काही जुनी घरे कोसळली आहेत. त्यांचे केवळ अवशेष दिसून येतात. 

कालावल खाडीपात्रात सन 2009 मध्ये वाळू उपसा करण्याचा ठेका घेतलेल्या संबंधित ठेकेदाराने संक्शन पंपाद्वारे वाळू उपसा करण्यास सुरवात केली त्यामुळे या बेटांची धूप होण्यास सुरवात झाल्याचा आरोप होत आहे.  खाडीतील बदलत्या पाण्याच्या प्रवाहामुळे माड बागायती मोठ्या प्रमाणात गिळकृंत होऊ लागली. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थ अनिल मसुरकर, पंढरीनाथ मसुरकर यांच्यासह अन्य मसुरकर कुटुंबीयांनी याप्रश्नी प्रशासन, शासनाचे लक्ष वेधले. संक्शनने होणारा वाळू उपसा हा धोकादायक असल्याने शासनाने संक्शन पद्धत बंद करून हातपाटी पद्धतीने वाळू उपसा करण्याचे  निर्देश त्याकाळी दिले. तर मसुरकर बेटाजवळ वाळू उपसा बंद झाला. त्यामुळे  कालावल खाडीपात्रात अन्य ठिकाणी केवळ हातपाटी पद्धतीने वाळू उपसा होतो.  अधिकृत स्वरूपात हातपाटीने सुरू असलेल्या या वाळू उपशाला आमचा विरोध नसल्याचे ग्रामस्थ सांगतात.

मसुरकर जुवा, खोत जुवा या दोन बेटांची होणारी धूप लक्षात घेता या बेटांचे अस्तित्व धोक्यात आले. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थ अनिल मसुरकर यांनी धूप प्रतिबंधक बंधार्‍यांच्या कामासाठी थेट पंतप्रधान, मुख्यमंत्री, पर्यावरण मंत्री रामदास कदम, माजी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार अरविंद सावंत, कोकण आयुक्‍त, जिल्हाधिकारी, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड यांचे निवेदनाद्वारे तसेच प्रत्यक्ष भेट घेऊन लक्ष वेधले. सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर गतवर्षी या दोन्ही बेटांच्या ठिकाणी धूप प्रतिबंधक बंधारे मंजूर करण्यात आले. मसुरकर जुवा बेटाच्या बंधार्‍यासाठी 1 कोटी 26 लाख 24 हजार 919 रुपयांची निविदा तर खोत जुवा येथील बंधार्याच्या 1 कोटी 26 लाख 91 हजार 291 रुपयांच्या निविदेस मान्यता देण्यात आली. मात्र, पर्यावरण विभागाच्या दाखल्याअभावीच ही कामे रखडल्याची माहिती समोर आली आहे.
 


  •