Thu, Apr 25, 2019 23:31होमपेज › Konkan › ‘चिपी’वरून गणेशोत्सवापूर्वी विमानोड्डाण!

‘चिपी’वरून गणेशोत्सवापूर्वी विमानोड्डाण!

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मालवण : प्रतिनिधी

देशातील छोट्या विमानतळांचा विकास होण्यासाठी आपण व्यापक मोहीम हाती घेतली आहे. रत्नागिरी विमानतळ व सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाला उडान योजनेत समाविष्ट करून घेण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. चिपी विमानतळाचे काम लवकरात लवकर पूर्ण करून गणेश चतुर्थीपूर्वी चिपी विमानतळ सुरू करू, अशी ग्वाही केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री सुरेश प्रभू यांनी  दिली. रत्नागिरी येथे आयोजित ‘राऊंड टेबल कॉन्फरन्स’ला उपस्थित राहिलेले केंद्रीय नागरी हवाई वाहतूकमंत्री सुरेश प्रभू यांनी रत्नागिरी विमानतळाची पाहणी केल्यानंतर दुपारी अडीच वाजता 2.30 वा. त्यांनी सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाला भेट दिली.

हेलिकॉप्टरद्वारे चिपी विमानतळावर दाखल झाल्यानंतर विमानतळाचे काम करणार्‍या आयआरबी कंपनीच्या अधिकार्‍यांनी सुरेश प्रभू यांचे स्वागत केले. आयआरबीचे राजेश लोणकर, मुख्य जनसंपर्क अधिकारी जयंत डांबरे, सुशील पांडे, अमर पाटील, वेंगुर्लेचे तहसीलदार गोसावी यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रभू यांनी विमानतळावरील पॅसेंजर टर्मिनसची पाहणी केली.  पत्रकारांशी संवाद साधताना सुरेश प्रभू म्हणाले, नागरी हवाई वाहतूक विभागाची सूत्रे हाती घेतल्यानंतर देशातील छोट्या विमानतळांच्या विकासासाठी आपण व्यापक मोहीम हाती घेतली आहे. याद‍ृष्टीने रत्नागिरी व सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचे काम लवकरात लवकर पूर्ण करून लवकरच उद्घाटन व्हावे, यासाठीच रत्नागिरीत चर्चासत्र आयोजित केले आहे.

रत्नागिरी विमानतळाच्या पायाभूत  सुविधांसाठी 30 ते 35 कोटी खर्च करण्यात येणार आहे. हे काम कोस्टगार्डमार्फत केले जाणार आहे. विमानतळ लवकरात लवकर पूर्ण होऊन विमान सेवा कार्यरत व्हावी यासाठी कार्यगट गठीत केला आहे. यामध्ये सर्व मंत्रालय व राज्य सरकार तसेच सर्व प्रकारचे प्रतिनिधी यांचा समावेश असणार आहे, असेही प्रभू म्हणाले. चिपी विमानतळाच्या कामाचे भूमिपूजन नारायण राणे मुख्यमंत्री व मी केंद्रीय मंत्री असताना झाले होते, त्याची कोनशिला आज पाहिली असे सांगत श्री. प्रभू यांनी जुन्या आठवणींना यावेळी उजाळा दिला. 

प्रभू पुढे म्हणाले, चिपी विमानतळाच्या काम लवकरात लवकर कसे होईल यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. विमानतळाच्या उर्वरित कामासाठी आवश्यक साहित्याची मागणी करून त्याची पूर्तता करण्यात यावी, अशी सूचना संबंधित कंपनीस त्यांनी केली. विमानतळ सुरू होण्यासाठी विविध परवानग्यांची आवश्यकता आहे. त्यामुळे आपले खाते, केंद्रीय गृह व संरक्षण खात्याकडून आवश्यक त्या परवानग्या लवकर कशा मिळतील यासाठी प्रयत्न करू. आवश्यक तेल पुरवठ्यासाठी केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्याशी चर्चा करून हा प्रश्‍न धसास लावला जाईल. चिपी विमानतळ उडाण योजनेत कसे घेता येईल यादृष्टीने प्रयत्न करणार आहे. 

जिल्ह्याच्या पर्यटन विकासाच्या आणि औद्योगिकरणाच्या, आर्थिक विकासाच्या दृष्टीने आवश्यक असणारा हा विमानतळ लवकर कसा सुरू केला जाईल यादृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. येत्या गणेश चतुर्थीपूर्वी हा विमानतळ प्रकल्प सुरू कसा होईल यासाठी आवश्यक ती पावले उचलण्यात आली आहेत.  विमानतळाला जोडणारे जे रस्ते आहेत त्यांचे रुंदीकरण व त्यामुळे वाढणारी वाहतूक लक्षात घेता नियोजन होणे गरजेचे आहे. यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचे श्री. प्रभू यांनी स्पष्ट केले. देशातील सर्व जिल्ह्यांचा औद्योगिक विकास व्हावा यासाठीचे नियोजन आपण केले होते. त्याला जोडून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी हे दोन जिल्हे पहिल्या टप्प्यात घेतले जाणार आहेत. त्याचा विस्तृत आराखडा तयार करण्यासाठी डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्रिअल पॉलिसी अ‍ॅण्ड प्रमोशन यांना काम करण्याच्या सूचना करण्यात आल्याचे  प्रभू यांनी स्पष्ट केले.
 


  •