Mon, Jan 27, 2020 10:44होमपेज › Konkan › ‘सर्वपक्षीयांची एकजूट’राजकीय अपरिहार्यताच! 

‘सर्वपक्षीयांची एकजूट’राजकीय अपरिहार्यताच! 

Published On: Feb 11 2019 1:24AM | Last Updated: Feb 11 2019 1:24AM
मालवण : मंगेश नलावडे

मालवण नगरपरिषद शतक महोत्सवानिमित्त नगराध्यक्ष व सर्वपक्षीय नगरसेवकांच्या एकजुटीचे अनेकांनी जाहीरपणे कौतुक केले. शतक महोत्सव सोहळ्यानिमित्त एका रंगमंचावर सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी गुण्यागोविंदाने  नांदत असल्याचे पाहून सारेच भारावून गेले. परंतु जेव्हा विकासकामांचा आणि एखाद्या मुद्यावरून राजकारणाचा विषय येतो  तेव्हा मात्र हे राजकीय पक्ष आपली वेगवेगळी दुकाने थाटून राजकीय श्रेयासाठी चढाओढ करताना दिसतात. त्यामुळे सार्वजनिक कार्यक्रमानिमित्त त्यांचे एकत्र येणे हे एक प्रकारची राजकीय अपरिहार्यताच म्हटल्यास ते वावगे ठरू नये!

वेगवेगळ्या सोहळ्याच्या निमित्ताने व कारणांवरून विविध राजकीय पक्षाचे नेते मांडीला मांडी लावून बसल्याचे आपण पहिले आहे. पण प्रत्येकजण आपल्या मनात राजकारणात इतरांपेक्षा मोठे होण्याचे स्वप्न ठेवून ही राजकीय एकजुटीची  औपचारिकता पूर्ण करत असतो.मालवणचे उदाहरण द्यायचे तर शतक महोत्सवी वर्षानिमित्त सर्व नगरसेवक एका छताखाली एकत्र येऊन कार्यक्रम यशस्वीतेसाठी झटताना दिसले. मात्र, शतक महोत्सवाअगोदरच समांतर बंदर जेटी बांधकामावरून रंगलेले राजकीय नाट्य सर्वानीच अनुभवले. समांतर बंदर जेटीचे काम निकृष्ट होत असल्याचा आरोप  महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नगरसेवक व आजी माजी पदाधिकार्‍यांनी करत ते काम बंद पाडले. तर सत्ताधारी शिवसेनेने या कामाला पाठिंबा दर्शवत बंदर विभागाला पुन्हा काम सुरू करण्यास सांगितले. याचाच अर्थ विकासकामांवरून राजकीय पक्षामध्ये एकमत नाही हे स्पष्ट होते. दोन्ही पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी बंदर विभागाशी स्वतंत्र चर्चा करत आप-आपला मुद्दा रेटून नेला. 

राजकीय चढाओढीचे आणि श्रेयवादाचे मालवण तालुक्यातील अजून एक मोठ उदाहरण म्हणजे वायंगणी-तोंडवळी येथे प्रस्तावित असलेला सी-वर्ल्ड प्रकल्प. मालवण नगरपरिषद शतक महोत्सवाच्या उद्घाटन समारंभप्रसंगी माजी आ. राजन तेली यांनी ‘सी वर्ल्ड’ प्रकल्पासाठी सर्वपक्षीय एकजुटीचे आवाहन केले.श्रेय मिळाले तर ते सर्वच पक्षीयांना मिळेल असेही ते म्हणाले. परंतु राजन तेली यांच्या भाषणानंतर आ. वैभव नाईक व पालकमंत्री दीपक केसरकर यांनी ‘सी वर्ल्ड’बाबत कोणतेही भाष्य केले नाही. याचाच अर्थ विकासाचा कोणताही मोठा विषय आपल्या हक्‍काच्या व्यासपीठावर घोषित करायचा याकडेच राज्यकर्त्याचा होर्‍ह  असतो हे स्पष्ट होते. आपल्या अधिकार कक्षेतील गोष्टी पूर्ण करत असताना इत्तर पक्षीयांकडे त्याचे श्रेय जाऊ नये याची काळजी प्रत्येक लोकप्रतिनिधी घेत असतात. शतक महोत्सवासारख्या कार्यक्रमात एकजूट दाखवणे ही राजकीय पक्षाची अपरिहार्यताच असते. कारण लोक मोठ्या संख्येने अशा कार्यक्रमांना उपस्थिती दाखवत असताना या गर्दीत आपण कुठे दुर्लक्षित राहू नये म्हणून राजकीय झेंड्याच्या पलीकडच्या कार्यक्रमात लोकप्रतिनिधी आपली उपस्थिती दर्शवतात, असे म्हटले तर ते चुकीचे ठरू नये.

आरोग्यसेवेसाठी तरी एकजूट दाखवा

शिवसेना आणि स्वाभिमान या दोन्ही पक्षाच्या पदाधिकार्‍यांमध्ये विकासकामांवरून आरोप-प्रत्यारोप आणि श्रेयाची लढाई सुरूच असते. परंतु जनतेसाठी अतिशय महत्वाच्या असणार्‍या आरोग्य सोयी-सुविधेबाबत या दोन्ही  पक्षांना आजवर अपयश आल्याचेच दिसते. शासकीय रुग्णालयातील सोयीसुविधाची वाणवा हा मुद्दा उचलून धरत  2014 च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या विरोधात रान उठवले  होते. पण स्वतः सत्तेत आल्यानंतर मात्र शिवसेनेला आरोग्य सुविधा सुधारता आलेली नाही. 

हार्ट अटॅकच्या रुग्णाला तातडीचा उपाय म्हणून 36 हजारचे इंजेक्शन घ्यावे लागते, हे आजचे चित्र आहे. येणार्‍या काळात निदान सर्व पक्षीयांनी  शासकीय आरोग्य यंत्रणा सुधारण्यासाठी तरी राजकीय एकजूट दाखवावी, अशी अपेक्षा सर्वसामान्य माणूस व्यक्‍त करत आहे.