Sun, Jul 21, 2019 01:28होमपेज › Konkan › मालवण-कोळंब पूल पूर्णपणे धोकादायक!

मालवण-कोळंब पूल पूर्णपणे धोकादायक!

Published On: Mar 05 2018 8:51PM | Last Updated: Mar 05 2018 8:15PMमालवण : प्रतिनिधी

मालवण-देवगड  मार्गावरील धोकादायक बनलेल्या कोळंब पुलाच्या दुरुस्तीस वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर अखेर डिसेंबर 2017 मध्ये मुहूर्त मिळाला. गेल्या दोन महिन्यात पुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र, प्रत्यक्षात पुलाची अवस्था अत्यंत नाजूक बनली असून पूल अधिकच धोकादायक असल्याचा अहवाल बांधकाम विभागाने मंत्रालय स्तरावर पाठवला आहे. 

वर्षभरापूर्वी कोळंब पुलाची तपासणी करण्यात आली. पुलाच्या बांधकामाचे काही नमुने तपासण्यात आले. त्यात पूल धोकादायक बनल्याने दुरुस्ती करण्याचा निर्णय झाला. धोकादायक बनल्याने पुलावरून एसटी व अवजड वाहतूक बंद करण्यात आली.पूल दुरुस्तीसाठी निविदा काढण्यात आल्या. मात्र, त्याला अल्प प्रतिसाद मिळाला. अखेर नोव्हेंबर 2017 मध्ये ठाणे येथील मे. इनोव्हेटिव्ह कॉन्ट्रोवेंचुयर या कंपनीची 4 कोटी 45 लाख रुपये खर्चाची निविदा वरिष्ठ कार्यालयाकडून मंजूर झाली. त्यानंतर प्रत्यक्षात कामाला सुरवातही करण्यात आली. दरम्यान, पुलाच्या दुरुस्तीचा कालावधी वर्षभर राहणार असल्याने वाहतूक ओझर-कातवड या पर्यायी मार्गा बरोबर कोळंब-निव्हे-आडारी या पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. 

डिसेंबर महिन्यात पुलाची दुरुस्तीसाठी ठेकेदाराकडून  पुलावरील रस्त्याचा काँक्रिट व  डांबरीकरण असा सुमारे 250 टन वजनाचा भाग हटवण्यात आला. त्यानंतर पुलाच्या प्रत्यक्ष दुरुतीचे काम हाती घेण्यात आले. तेव्हा पुलाच्या बांधकामासाठी वापरलेल्या लोखंडी शिगा पूर्णपणे गंजून गेल्याचे व काही शिगांचा चुरा झाल्याचे वास्तव समोर आलेे. पुलाच्या काही भागाची ही अवस्था असल्याने पुलाची पूर्ण तपासणी पुन्हा करण्यात आली. त्यात लोखंडी शिगा बरोबर काँक्रिट बांधकाही कमकुवत असल्याचे समोर आले आहे. तालुका, जिल्हा व राज्य स्तरावरील बांधकाम अधिकार्‍यांनी याची पहाणी करून अहवाल मंत्रालय स्तरावर पाठवला आहे. 

पुलाच्या दुरुस्तीत होणार बदल ?

कोळंब पूल अधिकच धोकादायक बनल्याने बांधकाम विभागाच्या मंत्रालय स्तरावरून दुरुस्तीत बदल करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरही केला जाण्याबाबत निर्णयाची शक्यता वर्तवली जात आहे. त्याबरोबरच नव्या पुलाबाबतही शासनाने निर्णय घ्यावा, अशी मागणी वाहनचालक व ग्रामस्थांतून होत आहे. 

नवीन पूलही प्रस्तावित

कोळंब पूल असलेला मार्ग पूर्वी सागरी महामार्ग होता. या मार्गाला राष्ट्रीय सागरी महामार्ग म्हणून तत्त्वता मान्यता मिळाली आहे. लवकरच या मार्गावरील रस्ते रुंदीकरणाबाबतही अंतिम निर्णय होणार आहे. त्यावेळी कोळंब पुलाच्या बाजूला नव्या मोठ्या पुलाची उभारणी होणार आहे. त्याला नेमका किती कालावधी जाईल याबाबात नेमकी कोणतीही माहिती नाही. याचा विचार करता दुरुस्ती सुरू असलेल्या कोळंब पुलाच्या बाजूला नवा पूल उभारावा याबाबत प्रस्तावही मंत्रालय स्तरावर पाठवण्यात आला आहे. 

पर्यटन व मासेमारी व्यवसायावर परिणाम

कोळंब पूल मार्गावर सर्जेकोट, रेवंडी, हडी, तळशील-तोंडवळी, वायंगणी व आचरा ही पर्यटनातून विकसित होत असलेली गावे आहेत. पुलावरून लक्झरी बस, टेम्पो ट्रॅव्हलर वाहतूक बंद असल्याने पर्यटनावर परिणाम झाला आहे. तर मासे वाहतूक करणारे मोठे कंटेनर टेम्पो जात नसल्याने मासेमारी व्यवसायालाही फटका बसला आहे. शाळकरी मुलांनाही फेरा मारून मालवणात यावे लागत आहे.