Mon, May 20, 2019 18:52होमपेज › Konkan › ‘मान्सून’च्या पार्श्‍वभूमीवर समुद्रात तुफानसदृष्य स्थिती

‘मान्सून’च्या पार्श्‍वभूमीवर समुद्रात तुफानसदृष्य स्थिती

Published On: May 25 2018 11:34PM | Last Updated: May 25 2018 10:04PMमालवण : प्रतिनिधी

अंदमानात दाखल झालेल्या मान्सूनमुळे समुद्रात मान्सूनच्या हालचालींना  वेग आला आहे.  गुरुवारी रात्रीपासून समुद्रात तुफान सदृश्य स्थिती निर्माण झाली असून मालवण बंदरात 2 नंबरचा बावटा लावण्यात आला आहे. हवामान खात्याने गुरुवार रात्रीपासून ते शनिवार 26 मे पर्यंत तीन ते सव्वातीन मीटरच्या उंच लाटा मालवण ते वसईच्या समुद्रात उसळण्याची शक्यता वर्तवली आहे.

शुक्रवारी मान्सून अंदमान- निकोबारमध्ये दाखल झाला. मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. अंदमानात दाखल झालेला मान्सून लवकरच केरळकडून कोकणमार्गे संपूर्ण महाराष्ट्रात प्रवेश करण्याची शक्यता  आहे. भारतीय हवामान विभाग मुंबई यांच्याकडून शुक्रवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास हवामानाच्या अंदाजानुसार मालवण ते वसई या किनार्‍यावर कालपासून उद्या शनिवारी रात्री 11.30 वाजेपर्यंत 3 ते 3.2 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता वर्तवली आहे. साध्य किनारपट्टीवर वार्‍याचा वेग वाढला असून तासी 60 किमी वेगाने वारे वाहू लागल्याने समुद्रासह किनार्‍यावर तुफान सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. मालवण बंदरात बंदरात विभागाने 2 नंबरचा बावटा लावला असून मच्छीमारांनी मच्छीमारीसाठी समुद्रात जाऊ नये,असा सतर्कतेचा इशारा  दिला आहे. शुक्रवारी दिवसाभर समुद्र खवळलेला अवस्थेत होता. 

नेहमीपेक्षा समुद्राच्या लाटांची उंची वाढल्याने शुक्रवार दुपारपासून सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी होडी सेवा वाहतुक बंद ठेवण्यात आली. तर मालवणसह देवबाग, तारकर्ली येथील वॉटर स्पोर्ट बंद ठेवण्यात आले. त्यामुळे मालवणात आलेल्या पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय झाली. शनिवारपासून सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी होडी सेवा वाहतूक बंद ठेवण्याचे आदेश बंदर विभागाने दिले आहेत.