मालवण : वार्ताहर
हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांच्या आरमाराची सागरी राजधानी म्हणून ओळखल्या जाणार्या मालवण समुद्रातील किल्ले सिंधुदुर्गचा 351 वा वर्धापन दिन शनिवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी किल्ल्याचे भूमिपूजन झालेल्या ‘मोरयाचा धोंडा’याठिकाणी गणेश पूजन करण्यात आले तर किल्ले सिंधुदुर्गात शिवराजेश्वर मंदिरात शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले.
यावेळी जय भवानी,जय शिवाजी... हर हर महादेव... छत्रपती शिवाजी महाराज की जय... अशा गगनभेदी घोषणा देत आणि थरारक मर्दानी खेळ सादर केले. मालवण येथील किल्ले सिंधुदुर्गच्या उभारणीस 351 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समिती,वायरी भूतनाथ ग्रामपंचायत आणि मालवण नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी सिंधुदुर्ग किल्ल्याचा 351 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.सकाळी 7 वा.दांडी-वायरी किनार्यावरील ‘मोरयाचा धोंडा’याठिकाणी वायरी सरपंच घन:श्याम ढोके यांच्या हस्ते श्री गणेश पूजन करण्यात आले.
यानंतर सिंधुदुर्ग किल्ल्यातील शिवराजेश्वर मंदिरात तहसीलदार समीर घारे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची पूजा करण्यात आली.कार्यक्रमात किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समितीचे अध्यक्ष गुरुनाथ राणे यांच्या ‘सिंधुदुर्ग- प्राचीन अर्वाचीन प्रवास’ या पुस्तकाचे प्रकाशन भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.नगराध्यक्ष महेश कांदळगावकर,भाजप नेते अतुल रावराणे,किल्ले प्रेरणोत्सव समितीच्या उपाध्यक्ष सौ. ज्योती तोरसकर,भाजप तालुकाध्यक्ष विजय केनवडेकर,नगरसेविका सेजल परब,सौ.तृप्ती मयेकर,नगरसेवक आपा,मंदिराचे पुजारी श्रीराम सकपाळ,दत्तात्रय नेरकर,प्रदीप वेंगुर्लेकर,बबलू राऊत,महेश मांजरेकर,दीपक सांडव,रवीकिरण आपटे,दादा मोरे,विकी तोरसकर,हेमंत वालकर,सुर्यकांत फणसेकर,प्राचार्य डॉ. श्रीरंग मंडले, प्रा.आर.एन. काटकर, प्रा. बी. एच. चौगुले, प्रा. एम. आर. खोत, वायरी भूतनाथ ग्रा.पं.सदस्य आदी उपस्थित होते.
प्रमोद जठार यांनी शिवाजी महाराजांच्या विविध पराक्रमांची माहिती देतानाच महाराजांना त्यांच्या सहकार्यांचे लाभलेले योगदान मोठे आहे. त्यामुळेच किल्ले सिंधुदुर्ग सारखी वास्तू उभी राहिली आहे. आज सिंधुदुर्ग किल्ल्याच्या देखभाल व संवर्धनासाठी शासनाकडून निधी मंजूर झाला असून लवकरच याबाबतचा आराखडा निश्चित करून कामही सुरू होईल,असा विश्वास व्यक्त केला. तर तहसीलदार समीर घारे यांनी सिंधुदुर्ग किल्ल्याच्या संवर्धनासाठी सर्व घटकांना सोबत घेऊन सर्वानी एकत्रित प्रयत्न केले पाहिजेत,असे सांगितले. सूत्रसंचालन ज्योती तोरसकर यांनी केले. यानंतर शिवराजेश्वर मंदिराच्या परिसरात न्यू शिवाजी ब्रिगेड, कोल्हापूर यांच्या पथकाने विविध चित्तथरारक मर्दानी खेळ सादर करत शिवरायांना सलामी दिली. यावेळी शिवप्रेमी नागरिक व पर्यटकांनी गर्दी केली होती. मूर्तीबाबत पुरावे उपलब्ध करावेत
श्रीराम सकपाळ यावेळी गुरुनाथ राणे यांच्या ‘सिंधुदुर्ग- प्राचीन अर्वाचीन प्रवास’ या पुस्तकात किल्ल्यातील शिवराजेश्वर मंदिरात असलेल्या शिवाजी महाराजांच्या मूर्ती विषयी असलेल्या माहितीबाबत मंदिराचे पुजारी श्रीराम सकपाळ यांनी आक्षेप घेतला. मंदिरात असणारी शिवाजी महाराजांची मूर्ती ही नावाड्याच्या रुपातील नसून ती शंकराच्या रुपातील आहे असा दावा यावेळी सकपाळ यांनी केला. या मूर्तीच्या इतिहासाबाबत अधिक अभ्यास करून त्याचे पुरावे उपलब्ध करावेत व त्या आधारे पुस्तकात माहिती नमूद करावी,असेही सकपाळ यांनी सांगितले. यावर अधिक अभ्यास करण्यात येईल,असे गुरुनाथ राणे व ज्योती तोरसकर यांनी सांगितले.
May 06 2018 1:09AM
May 06 2018 1:09AM
May 06 2018 1:09AM
May 06 2018 1:09AM
May 06 2018 1:09AM
May 06 2018 1:09AM