Mon, Sep 24, 2018 13:17



होमपेज › Konkan › निर्विघ्न महाशिवरात्रोत्सवासाठी योग्य नियोजन करा : जिल्हाधिकारी

निर्विघ्न महाशिवरात्रोत्सवासाठी योग्य नियोजन करा : जिल्हाधिकारी

Published On: Feb 06 2018 11:04PM | Last Updated: Feb 06 2018 9:01PM



देवगड : प्रतिनिधी

देवस्थान ट्रस्ट, ग्रामपंचायत व प्रशासन यंत्रणेने समन्वय साधून, एकोप्याने काम करा, यात्राकाळात भाविकांची कुठलीही गैरसोय होणार नाही, याची दक्षता घ्या व यात्रा सुरळीत पार पाडावी, अशा सूचना जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी प्रशासकीय अधिकार्‍यांना दिल्या.

महाशिवरात्री यात्रा 13 ते 15 या कालावधीत होत आहे. या यात्रेच्या नियोजनाचा आढावा जिल्हाधिकारी यांनी कुणकेश्‍वर मंदिर येथे आयोजित बैठकीत घेतला. कुणकेश्‍वर गावातील अंतर्गत रस्ते चिंचोळे, अरुंद आहेत. यामुळे यात्रेमध्ये रस्ता दुतर्फा थाटण्यात येणारी दुकाने रस्त्याचा साईडपट्टीपासून मागे घेण्याबाबत नियोजन करण्याची सूचना पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी केली. 

कुणकेश्‍वर यात्रेचा कालावधी तीन दिवस

यात्राकालावधीत  टॉयलेटस, चेजींगरूमची व्यवस्था करावी, फोनचे कॉल ड्रॉप होता नये, रेंज सुरळीत असावी अशा सूचना जिल्हाधिकार्‍यांनी  दिल्या. यावर्षी यात्रेचा कालावधी तीन दिवसाचा असून यात्रा चांगल्या पध्दतीने पार पाडावी, यासाठी देवस्थान ट्रस्ट, ग्रामपंचायत व सर्व विभागांनी एकमेकांशी समन्वय साधून यात्रेपूर्वी सर्व कामे पूर्ण करावीत अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकार्‍यांनी संबधित अधिकार्‍यांना दिल्या.

 कुणकेश्‍वर मंदीराकडे तारामुंबरी- मिठमुंबरी पूलमार्गे येणार्‍या रस्त्याचा सुरूचे बन याठिकाणी मातीचा भराव टाकून  रस्ता सुस्थितीत करण्याचे निर्देष त्यांनी बांधकाम विभागाला दिले.यावेळी पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम, प्रांताधिकारी नीता सावंत, सभापती जयश्री आडीवरेकर, नायब तहसीलदार प्रिया परब, देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष पुंडलिक नाणेरकर, गटविकास अधिकारी जयप्रकाश परब, पोलिस निरिक्षक जयकुमार सूर्यवंशी, कुणकेश्‍वर उपसरपंच रामानंद वाळके आदी उपस्थित होते.

एस्टी प्रशासनामार्फत जिल्ह्यातून 100 गाड्यांचा ताफा यात्रेसाठी सज्ज ठेवण्यात येणार आहे. या गाड्या  देवगड, कणकवली, मालवण, विजयदूर्ग व जिल्ह्यातील अन्य स्थानकातून यात्रेकरूंसाठी सोडण्यात येणार आहेत, अशी माहिती विभाग  नियंत्रकांनी दिली.

यात्राकालावधीत तीन ठिकाणी पार्कीग व्यवस्था करण्यात आली आहे. याठिकाणी पार्किंग यंत्रणा व वाहतूक पोलिस यांच्यामध्ये समन्वय असावा, अशा सूचना जिल्हा पोलिस अधीक्षकांनी दिल्या. यात्रा कालावधीत व्यापार्‍यांनी आवश्यक परवान्यांची एक प्रत स्वत:कडे ठेवावी, अन्यथा परवाना नसणार्‍या व्यापारी, व्यावसायिकांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिस अधीक्षकांनी दिल्या.

कुणकेश्‍वर बीचवर लाईटची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विद्युत पोल उभारावेत. किनार्‍यावर स्कूबा ड्रायव्हिंग युनिट तत्पर ठेवण्याच्या सुचना  जिल्हाधिकार्‍यांनी दिल्या. राज्य उत्पादन शुल्क विभागाची तीन पथके यात्रा कालावधीत कार्यरत राहणार असल्याची माहिती या विभागातर्फे देण्यात आली. ग्रामपंचायतीमार्फत बायोकंटेनर टॉयलेट समुद्रकिनारी ठेवण्यात आले असून कचर्‍याची योग्य विल्हेवाट लावण्याचे नियोजनही ग्रामपंचायतीमार्फत करण्यात आल्याची माहिती ग्रामसेवक पांडूरंग शेटगे यांनी दिली.