Tue, Jul 23, 2019 16:44होमपेज › Konkan › मराठी भाषा दिनासाठी आर्थिक तरतूद करावी

मराठी भाषा दिनासाठी आर्थिक तरतूद करावी

Published On: Aug 21 2018 1:37AM | Last Updated: Aug 20 2018 8:21PMरत्नागिरी : प्रतिनिधी 

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा करण्यात येतो़  या दिवशी रत्नागिरी पंचायत समिती आणि पंचायत समितीचा शिक्षण विभाग यांच्या संयुक्‍त विद्यमाने मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारक येथे दिवसभर भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रम होतात. या कार्यक्रमासाठी शासनाच्या सांस्कृतिक विभागाकडून दीड लाख रूपयांची आर्थिक तरतूद करण्यात यावी, असा ठराव आजच्या पंचायत समितीच्या मासिक सभेत घेण्यात आला़ 

विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकही मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी होतात़ कार्यक्रमासाठी कवी केशवसुत स्मारक येथे प्रशस्थ जागा उपलब्ध असल्यामुळे तसेच या स्मारकाला साहित्यिक वारसा असल्याने, या ठिकाणी हे कार्यक्रम होतात़ मात्र, यासाठी आर्थिक खर्चही  मोठ्या प्रमाणात होत असतो़   यासाठी निधी मिळावा ही मागणी सदस्य गजानन ऊर्फ आबा पाटील यांनी आयत्या वेळच्या विषयांमध्ये केली होती.

पंचायत समितीचे सभापती, उपसभापती यांना शासनाकडून मिळणारे मानधन तसेच सदस्यांना मिळणारा प्रवास भत्ता हा खूपच कमी आहे़ सध्या सभापतींना 10 हजार एवढे मानधन मिळते़  तर उपसभापतींना 8 हजार इतके मानधन आहे़ सदस्यांना प्रवास  भत्ता म्हणून दरमहा 1 हजार 200 रूपये मिळतात़  नगरपरिषदेच्या विचार केला, तर 500 ते  700 लोकसंख्येच्या एका वॉर्डचे प्रतिनिधीत्व करणार्‍या नगरसेवकाला 10 हजार रुपये प्रतिमहा एवढे मानधन मिळते़  पंचायत समिती सदस्य हा सुमारे 10 ते 12 हजार लोकसंख्येच्या एका  गणाचे प्रतिनिधीत्व करत असतो़  त्याला प्रतिमहा केवळ 1200 रूपये  एवढा प्रवास भत्ता दिला जातो़  त्यामुळे पंचायत समितीच्या सभापतीला किमान 25 हजार रूपये़, उपसभापतीला 15 हजार रूपये, तर सदस्यांना 10 हजार रूपये एवढे मानधन देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली असून, तसा ठरावही करण्यात आला आहे़