Mon, Apr 22, 2019 05:41होमपेज › Konkan › साडेपाच लाखांच्या ऐवजावर मोलकरणीनेच मारला डल्ला

साडेपाच लाखांच्या ऐवजावर मोलकरणीनेच मारला डल्ला

Published On: Dec 20 2017 1:41AM | Last Updated: Dec 19 2017 11:52PM

बुकमार्क करा

कुडाळ : प्रतिनिधी

कुडाळ-शिवाजीनगर येथील अभिषेक दत्ताराम गावडे यांच्या घरात गेली तीन वर्षे मोलकरीण म्हणून काम करणार्‍या सौ. शुभांगी गुंडू पार्सेकर (वय 42, रा. नेरूर-सोलयेवाडी) हिने रोख रक्‍कम व  सोन्याच्या दागिन्यांसह 5 लाख 62 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. 15 नोव्हेंबर 2016 ते 17 डिसेंबर 2017 या कालावधीत  मोलकरणीने ही हातसफाई केली आहे. याबाबतची फिर्याद कुडाळ पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली.  पोलिसांनी संशयित महिलेला अटक करून कुडाळ न्यायालयात मंगळवारी हजर केले असता, न्यायालयाने 
तिला दोन दिवस पोलिस कोठडी सुनावली. 

अभिषेक गावडे यांच्या घरात  शुभांगी पार्सेकर ही मोलकरीण म्हणून काम करत होती. कामातील वक्‍तशीरपणा व तिच्या घरची परिस्थिती गरीब असल्याने गावडे कुटुंबीयांनी तिच्यावर विश्‍वास ठेवला होता. दरम्यान, गेले काही महिने घरातील काही रोख रक्‍कम अचानक गायब होऊ लागली. त्यानंतर सोन्याचा एक हारही गायब झाला. 

या प्रकाराने गावडे कुटुंबीय संभ्रमात पडले. घराची अगर कपाटाची कुठलीही तोडफोड न होता, चोरी कशी होते? आपल्या घरात मोलकरणीशिवाय बाहेरील अन्य कुणाचाही वावर नसतो, मग चोरी नेमकी कशी होते, असे प्रश्‍न या कुटुंबाला पडले. मोलकरणीवर विश्‍वास असल्याने ती चोरी करत असावी, असे गावडे कुटुंबाला वाटत नव्हते. तरीही शंकेचे निरसन करावे म्हणून गावडे यांनी  सौ. पार्सेकर हिला विचारणा केली असता, तिने साळसूदपणे कानावर हात ठेवले; मात्र त्यानंतर तिने गावडे यांच्याकडे घरकामास येण्यास बंद केले. तसेच गावडे यांनी केलेला फोन उचलणेही बंद केले. तिच्या या वर्तनाने गावडे कुटुंबीयांचा तिच्यावरील संशय बळावला. अखेर अभिषेक गावडे यांनी कुडाळ पोलिस स्थानकात तिच्याविरोधात  चोरीची फिर्याद दिली. 

दरम्यान, सोमवारी सौ. पार्सेकर ही कुडाळ पोस्ट ऑफिसजवळ येणार असल्याची माहिती गावडे कुटुंबीयांना मिळताच श्‍वेता गावडे, धीरज परब, चेतन पडते, अ‍ॅड. आनंद गवंडे, शशांक पिंगुळकर, संकेत सडवेलकर यांच्या मदतीने सोमवारी दुपारी 3 वा. तिला गावडे कुटुंबीयांनी पकडले व पोलिसांना कल्पना दिली. आरोपी महिला असल्याने पोलिसांनी कुडाळ प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या परवानगीने सोमवारी रात्री 10.15 वा. सौ. पार्सेकर हिला अटक केली.  मंगळवारी  पोलिस उपनिरीक्षक एस. बी. पाटील यांनी आरोपीने चोरलेला मुद्देमाल कोठे लपवून ठेवला याच्या तपासणीसाठी तसेच या गुन्ह्यात कुणी सहकार्य केले का, याच्या तपासणीसाठी पोलिस कोठडीची शिक्षा मिळावी, अशी मागणी केली. 

यावेळी न्यायालयाने  सौ. शुभांगी पार्सेकर हिला दोन दिवसांची पोलिस कोठडी  सुनावली. अधिक तपास पोलिस निरीक्षक अविनाश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक एस. बी. पाटील करीत आहेत.