Wed, Nov 21, 2018 09:58



होमपेज › Konkan › ‘महामित्र’ला देशातील सोशल अ‍ॅपचे प्रथम रँकिंग

‘महामित्र’ला देशातील सोशल अ‍ॅपचे प्रथम रँकिंग

Published On: Feb 17 2018 2:07AM | Last Updated: Feb 16 2018 10:26PM



रत्नागिरी : प्रतिनिधी

‘सोशल मीडिया-महामित्र’ उपक्रमात राज्यातील तरुणांसह महिलांनी सहभागी होण्याचे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने करण्यात आले आहे. या उपक्रमास लाभत असलेल्या उदंड प्रतिसादानंतर ‘पब्रेन’ या संकेतस्थळाने ‘महामित्र’ अ‍ॅपला देशात प्रथम क्रमांकाचे ‘सोशल’ अ‍ॅपचे रँकिंग केल्याने ‘महामित्र’ची लोकप्रियता वाढत चालली आहे.ज्ञान आणि मनोरंजनाच्या साधनाबरोबरच लोकांची मने आणि मते घडविण्याची ताकद सोशल मीडियामध्ये असल्याचे आता सिद्ध झाले आहे. 

विविध समाज माध्यमांच्या वापरातून विवेकशील समाजनिर्मिती करण्याबरोबरच या समाजमाध्यमांचा विधायक कार्यात सकारात्मक उपयोग करुन घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सुरु केलेल्या ‘सोशल मीडिया-महामित्र’ उपक्रमाला राज्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत 25 हजारांपेक्षा अधिक सोशल मीडियाचा वापर करणार्‍यांनी या उपक्रमात सहभाग नोंदविला आहे. या उपक्रमात विशेषत: ग्रामीण भागातून उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत असून सर्वस्तरातून समाजमाध्यमकार सहभागी होत आहेत. यामध्ये युवक-युवती अग्रस्थानी आहेत. आतापर्यंत सुमारे 25 हजारांपेक्षा अधिक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदविला आहे. 

विधायक संदेशाची देवाण-घेवाण होत असेल तर विवेकी समाज तयार होतो हे सूत्र लक्षात घेऊन या सकारात्मक बाबींसाठी समाज माध्यमांचा प्रभावीपणे उपयोग करणार्‍या समाजमाध्यमकारांचा गौरव करण्याच्या दृष्टीने ‘सोशल मीडिया-महामित्र’ उपक्रम राज्यात राबविण्यात येत आहे.

सर्वसाधारपणे प्रत्येक तालुक्यातून एक याप्रमाणे त्या भागातील प्रभावी समाजमाध्यमकारांची विविध निकषांच्या आधारे निवड करून त्यांना मुख्यमंत्री तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत गौरविण्यात येणार आहे. सोशल मीडिया क्षेत्रातील प्रभावी व्यक्‍तींना भेटण्याची, प्रत्यक्ष संवाद साधण्याची, सेल्फी घेण्याची संधीदेखील मिळणार आहे.

‘गुगल प्ले स्टोअर’ अथवा पलच्या ‘अ‍ॅप स्टोअर’ वरुन महामित्र हे अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड करुन नोंदणी करता येणार आहे. या उपक्रमात राज्यातील 15 वर्षांवरील कोणीही रहिवासी विनाशुल्क सहभागी होऊ शकेल. प्रत्येक तालुक्यातून प्रत्येकी 10 ‘सोशल मीडिया महामित्र’ निवडले जाणार असून त्यांना जिल्हास्तरावर विशेष कार्यक्रमासाठी आमंत्रित केले जाईल. या महामित्रांची जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस आयुक्‍त, पोलिस अधीक्षक यांच्या समवेत समाज माध्यमाच्या सदुपयोगाबाबत गटचर्चा आयोजित करण्यात येईल. या गटचर्चेअंती तालुक्यातील प्रत्येकी 1 महामित्राची राज्यस्तरावर होणार्‍या कार्यक्रमासाठी निवड करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार्‍या राज्य स्तरावरील कार्यक्रमात समाज माध्यम क्षेत्रात प्रभावी अशा विविध क्षेत्रातील प्रतिष्ठितांना आमंत्रित करण्यात येईल. या कार्यक्रमात निवडलेल्यांना ‘सोशल मीडिया महामित्र’ पुरस्कार देण्यात येईल. तसेच त्यांना मान्यवरांशी संवाददेखील साधता येणार आहे.विहित निकषात असलेल्या 75 गुणांच्या आधारे प्रत्येक तालुक्यातील टॉप 20 सहभागी व्यक्‍तींची प्राथमिक फेरीत निवड करण्यात येईल. सहभागी व्यक्‍तीने या मोहिमेकरिता एक संदेश तयार करावा व तो अ‍ॅपमार्फत आयोजकांना पाठवावा. 

या संदेशाच्या आधारे 20 मधून 10 जणांची गट चर्चेसाठी निवड करण्यात येईल. गटचर्चेतील सहभागाआधारे 15 पैकी गुण देऊन या 10 पैकी एकाची राज्यस्तरावरील कार्यक्रमासाठी निवड करण्यात येणार आहे. त्यात त्यांना शासनाकडून ‘सोशल मीडिया-महामित्र’ म्हणून गौरविण्यात येणार आहे.