होमपेज › Konkan › महावितरणच्या अभियंत्याला मारहाण; गावखडीतील ११ जणांवर गुन्हा दाखल

महावितरणच्या अभियंत्याला मारहाण; गावखडीतील ११ जणांवर गुन्हा दाखल

Published On: Jun 04 2018 1:04AM | Last Updated: Jun 03 2018 10:39PMरत्नागिरी : प्रतिनिधी

राजापूर तालुक्यातील  महावितरणचे कनिष्ठ अभियंता आडिवरे येथे विद्युत वाहिनीचे कामकाज पाहण्यासाठी गेले होते. तेव्हा त्यांच्या सरकारी कामात अडथळा निर्माण करुन त्यांना व त्यांच्या सहकार्‍यांना मारहाण व धमकी दिल्याप्रकरणी 11 जणांविरोधात नाटे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवार 2 जून रोजी रात्री 12.30 वा. सुमारास घडली आहे.

याबाबत बाबू तोडणकर, बाळू भोसले, सुनिल मुडे व इतर 8 जण (सर्व रा. गावखडी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. त्यांच्याविरोधात कनिष्ठ अभियंता रोहित पर्शुराम भंडारे (27, रा. आडिवरे ता. राजापूर ) यांनी नाटे पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार, पर्शुराम भंडारे हे आडिवरे उपकेंद्र येथे कामकाज पाहतात.  शनिवार 2 जून रोजी रात्री विद्युत वाहिनीमध्ये बिघाड झाल्याने ते आणि त्यांचे सहकारी रात्री 12.30 वा. सुमारास आडिवरे गावी राजवाडी या ठिकाणी गेले होते.

तेव्हा बाबू तोडणकर, बाळू भोसले आणि सुनिल मुडे आणि इतर 8 जण असे 11 जण गैरकायदा जमाव करुन त्याठिकाणी आले.   त्यांनी भंडारे आणि त्यांच्या सहकार्‍यांना तुम्ही मुद्दाम आमची लाईट बंद करता. लाईट चालू केला नाहीत तर इलेक्ट्रीकच्या खांबाला उलटे टांगून ठेवू असे  म्हणत धकलाबुकल, शिवीगाळ व मारहाण केली. तसेच त्यांच्या कामात अडथळा निर्माण केला. त्यामुळे नाटे पोलिसांकडे तक्रार देण्यात आली आहे. त्यानुसार 11 जणांविरोधात नाटे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.