Sat, Feb 23, 2019 03:57होमपेज › Konkan › कोकणात वर्षभर गांधी विचारांचा जागर

कोकणात वर्षभर गांधी विचारांचा जागर

Published On: Aug 23 2018 1:27AM | Last Updated: Aug 22 2018 10:29PMरत्नागिरी ः प्रतिनिधी

कसला गांधी... रत्नांग्रीस फारसा आला नाही, पक्‍का तो, त्यास नेमके ठाऊक, इथे त्याच्या पंचाचे कौतुक नाही नि दांडीचे नाही...आम्ही सगळे पंचेवाले, त्याच्या पेक्षाही उघड.. सुताबितात तथ्य नाही, तिसरं शस्त्र उपासाच इथं...निम्म कोकण उपाशी  ...असे ‘पुलं’च्या लेखणीतील अंतू बर्वाच्या रूपात कोकणी माणसाचे गांधी विचार ओसरले असले तरी आगामी वर्षभरात महात्मा गांधींच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती वर्षानिमित्त कोकणात गांधी विचारांचा जागर होणार आहे. यामध्ये शालेय विद्यार्थ्यांबरोबर कोकण रेल्वे, कोकण विभागीय मंडळासह अन्य शासकीय आणि निमशासकीय विभागांनी वर्षभराचा ‘टाईमबाऊंड’ कार्यक्रम निश्‍चित केला आहे. 

दि. 2 ऑक्टोबरपासून महात्मा गांधींच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती वर्षाला सुरुवात होणार आहे. यानिमित्त कोकणातील सर्व शाळा सहभागी होणार आहेत. या शाळांतील विद्यार्थी 2 ऑक्टोबर 2018 ते 2 ऑक्टोबर 2019 या वर्षभराच्या कालावधीत गांधीजींच्या विचाराचा जागर करण्यात येणार आहे. यामध्ये गांधी विचारावर आधारित निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा,  गांधी विचारावर आधारित व्याख्याने आदी भरगच्च कार्यक्रमांचे वर्षभराचे नियोजन केले आहे. शाळांबरोबर शासकीय आणि निमशासकीय संस्थाही या जागरात सहभागी होणार आहेत. यामध्ये कोकण रेल्वे, कोकण विभागीय मंडळ,  सहकार मंडळात समाविष्ट असलेल्या सहकारी बँका आणि संस्थाचाही सहभाग निश्‍चित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात स्वच्छता, अहिंसा, सहकार आणि  सत्यता या गांधीतत्वांच्या  विचारावर आधारित वर्षभरासाठी प्रदर्शन, सादरीकरण, व्याख्याने आदी कार्यक्रमांचे नियोजन केले आहे.

शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी गांधी जयंती वर्षानिमित्त नियोजन

2 ऑक्टोबर रोजी शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी गांधी जयंती वर्षाला प्रारंभ, 1 ते 30 नोव्हेंबर सविनय कायदेभंग, असहकार, भारत छोडो या विषयांवर निबंध स्पर्धा,  1 ते 31 डिसेंबर विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन,1 ते 31 जानेवारी 2019 गांधी विचारावर आधारित चित्रकला स्पर्धा, 1 ते 28 फेब्रुवारी गांधी विचारांवर आधारित प्रश्‍नमंजुषा कार्यक्रम, जून ते ऑक्टोबरमध्ये गांधी विचारांची व्याख्याने आणि उपक्रम, 2 ऑक्टोबर 2019 रोजी शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी गांधी जयंती वर्षाचा समारोप.