होमपेज › Konkan › चिपळूणमध्ये उद्या ‘स्वाभिमान’चा मेळावा 

चिपळूणमध्ये उद्या ‘स्वाभिमान’चा मेळावा 

Published On: Jul 31 2018 2:01AM | Last Updated: Jul 31 2018 1:59AMचिपळूण : खास प्रतिनिधी

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या वतीने चिपळुणात 1 ऑगस्ट रोजी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील बाळासाहेब माटे सभागृहात सायंकाळी 4 वा. हा मेळावा होणार आहे. स्वाभिमान पक्षाच्या स्थापनेनंतर प्रथम खा. नारायण राणे यांची तोफ चिपळुणात धडाडणार आहे. यावेळी पक्षाच्या माध्यमातून त्यांचा सत्कारदेखील करण्यात येणार आहे. 

या मेळाव्याला स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस व माजी खासदार नीलेश राणे उपस्थित राहाणार आहेत. काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर व स्वाभिमान पक्षाची स्थापना केल्यानंतर खा. नारायण राणे राजकीय दौर्‍यानिमित्त प्रथमच चिपळुणात येत आहेत. याआधी माजी आ.नाना जोशी यांच्या प्रथम वर्ष स्मृतीदिनानिमित्त ते चिपळुणात आले होते. मात्र, हा राजकीय दौरा नसल्याने यावेळी त्यांनी राजकीय कार्यक्रम टाळले. मात्र, आता खासदार झाल्यानंतर प्रथमच त्यांचा दौरा होत असल्याने त्यांच्या दौर्‍याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता लागून राहिली आहे. स्वाभिमान पक्षाचे संस्थापक-अध्यक्ष खा. राणे या मेळाव्यात काय मार्गदर्शन करणार, कार्यकर्त्यांना कोणता संदेश देणार या बाबत उत्सुकता आहे. या दौर्‍याच्या निमित्ताने स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य आले आहे. 

या मेळाव्याला जिल्हाध्यक्ष रवींद्र नागरेकर, तालुकाध्यक्ष अजय साळवी, नगरसेवक परिमल भोसले, महिला जिल्हाध्यक्षा मेघना शिंदे, मंगेश शिंदे आदी मेळावा यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत. स्वाभिमान पक्षाची ध्येयधोरणे, पुढील वाटचाल, आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची रणनीती, संघटनात्मक बांधणी या मुद्यांवर मेळाव्यात चर्चा होणार आहे. भाजप, सेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या राजकीय पक्षांच्या स्पर्धेत कोकणात आता स्वाभिमान पक्ष उतरत आहे. त्यामुळे चिपळुणातील मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.