Mon, Jan 27, 2020 12:44होमपेज › Konkan › महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिल निवडणूक अ‍ॅड. संग्राम देसाई विजयी

महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिल निवडणूक अ‍ॅड. संग्राम देसाई विजयी

Published On: Jul 23 2019 1:18AM | Last Updated: Jul 22 2019 9:45PM
सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी 

महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिल पंचवार्षिक निवडणुकीत पहिल्यांदाच सिंधुदुर्ग सुपुत्राची वर्णी लागली आहे. येथील ज्येष्ठ व प्रथितयश वकील संग्राम देसाई यांनी या निवडणुकीत बाजी मारली आहे. मार्च 2018 पासून निवडणूक प्रक्रिया सुरू असलेल्या या निवडणुकीचा सोमवारी निकाल लागला. सिंधुदुर्ग जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने कोकणसह जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी वकील संग्राम देसाई यांनी निवडणूक लढविली होती. कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधी म्हणून ही निवड झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्याच नव्हे तर संपूर्ण कोकण विभागाच्या इतिहासात प्रथमच वकील संग्राम देसाई यांच्या रुपाने महाराष्ट्र-गोवा बार कौंन्सिलवर संचालक म्हणून निवड झाली आहे. याबाबत अ‍ॅड.देसाई यांचे  अभिनंदन होत आहे.

बार कौन्सिल ऑफ गोवा- महाराष्ट्रची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया मार्च 2018 मध्ये सुरु झाली होती. 25 सदस्य पदांसाठी झालेल्या या निवडणुकीसाठी बार कौन्सिलची स्थापना झालीपासून आतापर्यंत सिंधुदुर्गातून कोणीही निवडून रिंगणात उतरला नव्हता. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोकणचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी सिंधुदुर्गातून उमेदवार देण्याचा निर्णय सिंधुदुर्ग जिल्हा बार असोसिएशनने घेतला होता. त्यानुसार अ‍ॅड. संग्राम देसाई यांना पाठिंबा देत उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरविण्यात आले होते. 

महाराष्ट्र आणि गोवा राज्यात बार कौन्सिलचे एकूण 1 लाख 23 हजार मतदार आहेत. या निवडणुकीतून 25 उमेदवार निवडले जातात. ही निवडणूक आतापर्यंत सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातील एकाही उमेद्वाराने लढविलेली नव्हती. त्यामुळे सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी येथील उमेदवार देण्याचा व निवडणुक लढविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी सर्वानुमते   संग्राम देसाई यांना उमेदवारी निश्चित करून भरघोस मतांनी निवडून आणण्याचा निर्णय सिंधुदुर्ग जिल्हा बार असोशिएशनने घेतला होता. अ‍ॅड.देसाई यांच्या विजयासाठी सिंधुदुर्ग बार असोसिएशनने प्रचंड मेहनत घेतली आहे.