Sat, Feb 16, 2019 07:15होमपेज › Konkan › गणपतीपुळे विकास आराखडा मंजूर

गणपतीपुळे विकास आराखडा मंजूर

Published On: Mar 09 2018 11:29PM | Last Updated: Mar 09 2018 10:31PMरत्नागिरी : विशेष प्रतिनिधी

आ. उदय सामंत यांनी सुचवलेल्या सुधारणांनुसार गणपतीपुळे विकास आराखडा मंजूर झाला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात 79 कोटी रुपयांचा आराखडा मंजूर झाला असून, 20 कोटी रुपयांची अर्थसंकल्पात तरतूद झाली आहे. प्रथम हा आराखडा 50 कोटी रुपयांचा होता. आ. सामंत यांनी 25 कोटी रुपये खर्चाच्या महत्त्वाच्या रस्त्यांची कामे आराखड्याच्या दुसर्‍या टप्प्यात घेण्यास भाग पाडून इतर अनेक सुधारणा करण्याच्या सूचना केल्या होत्या. गेल्या अनेक वर्षांपासून गणपतीपुळे विकास आराखडा विविध अडचणींमध्ये सापडून रखडला होता.

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गणपतीपुळे विकास आराखड्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली होती. त्यानुसार जिल्हाधिकार्‍यांनी संबंधित सर्व अधिकार्‍यांची बैठक घेऊन विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना केल्या होत्या. पहिल्या टप्प्यात 50 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला होता. यामध्ये 200 मीटर परिघातील पार्किंग, जलशुद्धीकरण प्रकल्प, पथदीप, हायमास्ट, गणपतीपुळेची पाणी योजना अशी कामे समाविष्ट होती. परंतु, रस्त्यांचा विषय बारगळला होता.

स्थानिक लोकप्र्रतिनिधींना विश्‍वासात न घेता पहिला आराखडा बनवला गेल्याने आणि त्यात रस्ते विषय बारगळला असल्याने या आराखड्याला म्हणावा तसा अर्थ नव्हता. आ. सामंतांनी पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्याकडे काही आराखड्यातील काही सुधारणांची मागणी करून रस्त्यांची कशी आवश्यकता आहे, हे बैठकीत पटवून दिले होते. त्यानुसार सुधारित आराखडा शासनाकडे पाठवण्यात आला होता. तो चालू अधिवेशनात मंजूर करून 20 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचे आ. उदय सामंत यांनी सांगितले.