Tue, Jul 16, 2019 01:45होमपेज › Konkan › कणकवलीत ‘महाड चवदार तळे क्रांती’ दिन स्मृती जागर 

कणकवलीत ‘महाड चवदार तळे क्रांती’ दिन स्मृती जागर 

Published On: Mar 23 2018 1:58AM | Last Updated: Mar 22 2018 10:56PMकणकवली : शहर वार्ताहर

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘महाड चवदार तळे क्रांती दिन’ चऴवळीला 90 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कणकवलीत दर्पण सांस्कृतिक मंचाच्यावतीने स्मृती जागर कार्यक्रम घेण्यात आला.‘पाण्याला नसतो रंग, नसते चवही, पाणी नसते पवित्र-अपवित्रही म्हणून तू पाण्याला चवदार बनविलेस...तहानेपेक्षाही पाणी असते. जगण्याची अस्मिता हेही दाखवून दिलेस... अशा अस्मिता जागृत करणार्‍या एकापेक्षा एक नितांत आशयघन कविता या कार्यक्रमात सादर करण्यात आल्या.

कणकवली बौद्धविहारच्या पंटागणावर झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन कवी अजय कांडर यांच्या ‘युगानयुगे तूच’ या आंबेडकरांवरील दीर्घकाव्यातील ‘पाण्याची अस्मिता’ या कवितेने करण्यात आले. दर्पणचे अध्यक्ष राजेश कदम, निवृत्‍त उपजिल्हाधिकारी सुरेश कदम, गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष डॉ.प्रा.राजेंद्र मुंबरकर, कवी प्रा.मोहन कुंभार, सिद्धार्थ तांबे, डी.बी.कदम, नीलम पवार, प्रा.सीमा हडकर आदी उपस्थित होते. 

मराठी साहित्यातील नामवंत कवींच्या कविता या कार्यक्रमात सादर करण्यात आल्या. यात कवी सिद्धार्थ तांबे यांनी ज्येष्ठ कवी अरूण काळे यांच्या आंबेडकरांवरील ‘तू मदरबोर्ड यांच्या संगणकाचा, माणसाला वस्तू करून उभं केल जातय, आता ही लढाई येत आहे, निर्णायक टप्प्यात स्वतःच्या स्वातंत्र्यासाठी’ या सादर केलेल्या कवितेला उपस्थितांमधून चांगलाच प्रतिसाद मिळाला, तर मोहन कुंभार यांनी ‘सूर्यतेजानं तळपणार्‍या महामानवा, अन्यायी काळया अंधाराची तू केलीस चिरफाड’ ही कविता सादर करून आंबेडकरांनी अन्यायाला वाचा फोडलेल्या आठवणी जागृत केल्या. रवी ओटवकर यांनी ‘तू पेरली माणुसकीची बीजे, सुरेश कदम, शशिकांत तांबे, प्रा.सीमा हडकर, रक्षा कदम, प्रा.राजेंद्र मुंबरकर, नरेंद्र तांबे, किशोर कदम, महेश काणेकर, रवींद्र तांबे आदींनी कविता वाचन केले.

दुसर्‍या सत्रात स्वरधारा गु्रप, तांबोळी-बांदा यांचा आंबेडकरी क्रांतीदर्शी गीत गायनाचा कार्यक्रम झाला. त्यालाही उपस्थितांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सूत्रसंचालन प्रा.सूचिता गायकवाड यांनी केले.

या कार्यक्रमानिमित्त राजेश कदम म्हणाले, फुले-शाहू दर्पण सांस्कृतिक मंचतर्फे गेली अनेक वर्षे सामाजिक कामाबरोबर साहित्य आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. पण चवदार तळे क्रांती दिन कार्यक्रमाला फार महत्त्व आहे. कारण कोणत्याही कार्यक्रमांपेक्षा अस्मितेच्या जागराचा कार्यक्रम महत्त्वाचा असतो. कार्यक्रमात मराठी साहित्यातील नामवंत कवींच्या आंबेडकरांवरील कवितांचे वाचन इथल्या मान्यवरांनी केले. समतेच्या दिशेने आंबेडकरांनी समाजाला नेण्याचे काम केले असल्याचा विचार या सर्वच कवितांमधून व्यक्‍त झाला.