Fri, Aug 23, 2019 14:25होमपेज › Konkan › नगराध्यक्ष माधुरी गायकवाड ‘स्वाभिमान’ पक्षात

नगराध्यक्ष माधुरी गायकवाड ‘स्वाभिमान’ पक्षात

Published On: Mar 19 2018 1:50AM | Last Updated: Mar 19 2018 1:50AMकणकवली : प्रतिनिधी

कणकवलीतील भाजी मार्केट आरक्षण विकासकाला विकसित करण्यास मंजुरी दिल्यामुळे संदेश पारकर गटापासून काहीशा दुरावलेल्या कणकवलीच्या विद्यमान नगराध्यक्षा सौ. माधुरी गायकवाड यांनी गुढीपाडव्याचा मुहूर्त साधत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात प्रवेश केला. त्यामुळे पारकर गटाला ऐन निवडणुकीत धक्का बसला आहे. दरम्यान, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने नगरसेवकपदासाठी 10 उमेदारांची यादी रविवारी सायंकाळी जाहीर केली. सोमवारी सकाळी नगराध्यक्ष व उर्वरीत 7 उमेदवारांची यादी जाहीर करून प्रचार रॅलीने सर्व उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

आ. नितेश राणे यांनी नगराध्यक्षा सौ. माधुरी गायकवाड यांचे स्वागत केले. यावेळी माजी जि.प. अध्यक्ष संदेश सावंत, स्वाभिमानचे तालुकाध्यक्ष सुरेश सावंत, नगरसेवक समीर नलावडे, बंडू हर्णे, सोमा गायकवाड उपस्थित होते. स्वाभिमानने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत प्रभाग 1 मधून सौ. कविता किशोर राणे, प्रभाग 2 मधून सौ. प्रतीक्षा प्रशांत सावंत, प्रभाग 4 मधून अबिद नाईक (राष्ट्रवादी), प्रभाग 5 मधून सौ. मेघा गांगण, प्रभाग 8 मधून उर्मी योगेश जाधव, प्रभाग 9 मधून पूजा विनोद सावंत, प्रभाग 11 मधून विराज भोसले, प्रभाग 12 मधून गणेश उर्फ बंडू हर्णे, प्रभाग 15 मधून ज्योतिका जीवनप्रकाश माणगावकर, प्रभाग 17 मधून रवींद्र बाळकृष्ण गायकवाड यांचा समावेश आहे. पहिल्या यादीत चार जुने चेहरे वगळता सहा नवीन चेहर्‍यांना स्वाभिमानने संधी दिली आहे. सोमवारी सकाळी 10 वा. खा.नारायण राणे हे नगराध्यक्ष व इतर 7 उमेदवारांची यादी जाहीर करणार आहेत. त्यानंतर पटकीदेवीकडून बाजारपेठ मार्गे पटवर्धन चौकातून तहसील कार्यालय अशी प्रचार रॅली काढून उमेदवारांचे अर्ज दाखल केले जाणार आहेत, अशी माहिती समीर नलावडे यांनी दिली. 

नि:पक्षपातीपणे काम करता येत नव्हते : नगराध्यक्षा सौ. गायकवाड 

आपण व्यक्तीगत कुणावरही टीका करणार नाही. पाच वर्षांपूर्वी नारायण राणे व संदेश पारकर यांच्या नेतृत्वाखालीच आपण नगरसेवक झाले. मात्र ज्यावेळी नगराध्यक्षपदी विराजमान होतो त्यावेळी कुठल्या एका पक्षाचा राहत नाही. पक्षभेद विसरून लोकांची कामे करणे आवश्यक असते. मात्र, मला गेल्या अडीच वर्षांपासून त्या ठिकाणी काम करत असताना ‘त्यांच्या’ वैयक्तिक हेवेदाव्यांमुळे नि:पक्षपातीपणे काम करता येत नव्हते. सर्वांचीच कामे व्हावीत हे आमचे प्रयत्न होते. मात्र, यातून गैरसमज निर्माण झाले व मला त्रास होत होता. मनाला एखादा विषय पटत नसला तरी निर्णय घ्यावा लागत होता, असे नगराध्यक्षा सौ. माधुरी गायकवाड यांनी स्वाभिमान पक्षात प्रवेश केल्यानंतर सांगितले.

मात्र, आपणाला नक्की कुणाचा त्रास होत होता? असा प्रश्‍न विचारला असता त्यांनी कुणाचे नाव घेतले नाही, परंतु पत्रकारांना सर्व काही माहिती आहे, असे सांगत थेट कुणाचेही नाव घेण्याचे टाळले. मात्र, त्यांचा रोख हा पारकर यांच्याकडेच होता. त्या म्हणाल्या, आ.नितेश राणे यांच्या कामाची धडाडी आणि काम करण्याची पध्दत आपल्याला आवडल्याने आपण स्वाभिमान पक्षात प्रवेश करत आहे. त्यांनी संधी दिल्यास निवडणुकीत नगरसेवकपदासाठी इच्छुक आहे असे सांगितले. यावेळी आ. नितेश राणे यांनी निवडणूक प्रचारावेळी याविषयी अनेक मुद्यांवर भाष्य करू, असे सांगत विरोधकांना सूचक इशारा दिला.