Wed, Jun 26, 2019 23:57होमपेज › Konkan › चाकरमान्यांचा खेड रेल्वे स्थानकात शिमगा

चाकरमान्यांचा खेड रेल्वे स्थानकात शिमगा

Published On: Mar 05 2018 8:51PM | Last Updated: Mar 05 2018 8:39PMखेड : प्रतिनिधी 

शिमगोत्सवासाठी कोकणात आलेल्या लाखो पर्यटकांच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. रविवारी कोकण रेल्वेच्या खेड स्थानकात मुंबईला जाणार्‍या प्रवाशांना रेल्वेमध्ये शिरण्यासाठी जागाच न मिळाल्याने गोंधळ घातला.

रविवारी सायंकाळी 4:16 वाजता खेड रेल्वे स्थानकात आलेल्या 10104 मडगाव - मुंबई (मांडवी एक्सप्रेस) गाडीला संतप्त प्रवाशांनी तब्बल एक तास रोखून धरले. आधीच भरून आलेल्या या एक्सप्रेसमध्ये गर्दीमुळे आतमध्ये शिरण्यासदेखील जागा नव्हती. त्यामुळे संतप्त शेकडो प्रवाशांनी मांडवी एक्सप्रेसच्या इंजिन समोर ठिय्या मांडला. अनेक महिला आणि पुरूष प्रवासी चक्‍क मांडवी एक्सप्रेसच्या इंजिनवर जाऊन बसले. 4:16 वाजता खेड स्थानकात आलेली मांडवी एक्सप्रेस या गोंधळामुळे 5:10 वाजता मुंबईच्या दिशेने रवाना झाली. तासभर चाललेल्या संतप्त प्रवाशांच्या गोंधळामुळे रेल्वे प्रशासनदेखील गोंधळून गेले होते.

शिमगोत्सवासाठी मुंबईतून लाखो चाकरमानी कोकणात दाखल झाले आहेत. आता या कोकणात आलेल्या लाखो चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. परिणामी कोकण रेल्वेला मोठी गर्दी निर्माण झाली आहे. खेड रेल्वेस्थानक हे खेड, दापोली, मंडणगड तालुक्यांचे महत्त्वाचे स्थानक असून मुंबईला जाण्यासाठी रविवारी दुपारपासून शेकडो प्रवाशांनी खेड स्थानकामध्ये गर्दी केली होती. सायंकाळी 4:15 वाजता नियमित वेळेत येणारी 10104 मडगाव - मुंबई मांडवी एक्सप्रेस आपल्या वेळेत खेड रेल्वे स्थानकामध्ये आली. मात्र, ही गाडी रत्नागिरीपूर्वीच्या स्थानकांवर पूर्णत: भरली होती. खेड स्थानकात शेकडो प्रवाशी मुंबईला जाण्यासाठी उभे होते. अनेकांचे आरक्षणदेखील होते. मात्र, कोणालाही आतमध्ये शिरता आले नाही. अनेक डब्यांचे दरवाजे आतील प्रवाशांनी आधीपासूनच बंद करून घेतल्याने गाडीची वाट बघत उभे असणारे हजारो प्रवाशी संतप्त झाले. त्यांनी मांडवी एक्सप्रेससमोर गोंधळ घातला.

एक तास मांडवी एक्सप्रेस रोखली...

एक्सप्रेस खेड स्थानकात आली असता गर्दीमुळे काही प्रवाशांचा संताप अनावर झाला. 150 ते 200 प्रवासी थेट रेल्वे इंजिनवर चढले. त्यामध्ये महिलांचादेखील मोठा समावेश होता. अखेर 5 वाजताच्या दरम्यान सावंतवाडी - दिवा एक्सप्रेस मागून आल्यानंतर मांडवी एक्सप्रेसच्या इंजिनवर बसलेले प्रवासी सावंतवाडी - दिवा एक्सप्रेसमध्ये बसण्यासाठी गेले. त्यामुळे मांडवी एक्सप्रेसचा मार्ग मोकळा झाला. तब्बल एक तासानंतर मांडवी एक्सप्रेस खेड स्थानकातून मुंबईकडे रवाना झाली.