Mon, Mar 25, 2019 02:51
    ब्रेकिंग    होमपेज › Konkan › ‘पुरुषोत्तम’च्या प्राथमिक फेरीत ‘म्याडम’ प्रथम

‘पुरुषोत्तम’च्या प्राथमिक फेरीत ‘म्याडम’ प्रथम

Published On: Aug 23 2018 1:27AM | Last Updated: Aug 22 2018 9:09PMरत्नागिरी : प्रतिनिधी

येथील पटवर्धन हायस्कूल येथे झालेल्या पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या कोकण विभागीय स्तरावरील प्राथमिक फेरीत गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या ‘म्याडम’ एकांकिकेने प्रथम क्रमांक पटकावला. या एकांकिका स्पर्धेत कोकण विभागातील 12 महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता. 

महाविद्यालयीन क्षेत्रात मानाची समजली जाणारी ही स्पर्धा महाराष्ट्र कलोपासक पुणेतर्फे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे उद्घाटन ज्येष्ठ रंगकर्मी गणेश गुळवणी यांच्या हस्ते करण्यात आले. तीन दिवस झालेल्या या स्पर्धेत द्वितीय क्रमाकांचा सुमनताई केतकर करंडक वनशास्त्र महाविद्यालय दापोलीच्या ‘चोली के पिछे क्या है’ एकांकिकेने तर तृतीय क्रमांकाचा पंढरीनाथ नेने करंडक स.ह.केळकर महाविद्यालय देवगडच्या ‘10 वाजून 10 मिनिटे’ या एकांकिकेने पटकावला. सर्वोत्कृष्ट प्रायोगिक एकांकिकेचा कुमार जोशी करंडक डी.बी.जे. चिपळूणच्या ‘बिटविन द लाईफ’ने पटकावला.

गोगटे जोगळेकरच्या स्मितल चव्हाण हिला ‘म्याडम’ एकांकिकेतील मंगल या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार देण्यात आला. सर्वोत्कृष्ट वाचिक अभिनयाचा पुरस्कार वनशास्त्र दापोलीच्या विष्णूप्रिया एस. हिला ‘चोली के पिछे क्या है’ एकांकिकेतील राणी या भूमिकेसाठी देण्यात आला. अभिनय नैपुण्य अभिनेत्याचा पुरस्कार ओमकार कानेरकर याला तर अभिनेत्रीचा पुरस्कार संचिता जोशीला मिळाला. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन स्मितल चव्हाण हिला ‘म्याडम’ या एकांकिकेसाठी देण्यात आला. तर विद्यार्थी लेखकचा पुरस्कार ‘10 वाजून 10 मिनिटे’ या एकांकिकेचे लेखक अभिषेक कोयंडे यांना देण्यात आला. प्राथमिक फेरीतील प्रथम चार क्रमाकांच्या एकांकिका राज्यस्तरासाठी पात्र ठरल्या आहेत.या स्पर्धेचे परीक्षण विनय घोसाळकर, शैलेश देशमुख आणि शिरीष उकिडवे यांनी केले. विजेत्यांना बक्षिसाचे वितरण नगरसेविका शिल्पा सुर्वे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नाटककार अनिल दांडेकर, तेजा मुळ्ये आदी उपस्थित होते.