Tue, Oct 22, 2019 02:30होमपेज › Konkan › जेटीवरील असुविधा खासदारांच्या निदर्शनास

जेटीवरील असुविधा खासदारांच्या निदर्शनास

Published On: Jan 28 2018 11:59PM | Last Updated: Jan 28 2018 11:27PMरत्नागिरी : विशेष प्रतिनिधी

तालुक्यातील पर्ससीन नेट मच्छिमारांना संघटीत केल्यानंतर रत्नागिरी तालुका पर्ससीन नेट मच्छिमार मालक असोसिएशनने आवश्यक असणार्‍या समस्या सोडवून घेण्याकडे लक्ष केंद्रीत केले आहे. खा. विनायक राऊत यांना मिरकरवाडा जेटीवर नेले. खासदारांना जेटीवर लाईट व्यवस्था, लिलाव मार्केट, आईस प्‍लँट, कोल्ड स्टोअरेज, इंधन अशी कोणतीच व्यवस्था नसल्याचे दाखवून देण्यात आले. या सुधारणा तातडीने करून देण्याची मागणी करत मच्छिमार मालक असोसिएशनने मच्छिमारांमधील वाद-विवाद मिटतील असे प्रयत्न करण्याची विनंती केली.

खा.राऊत यांच्यासह आ. उदय सामंत, नेते किरण सामंत, जिल्हाप्रमुख महेश उर्फ बाबू म्हाप, तालुकाप्रमुख प्रदीप उर्फ बंड्या साळवी, सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त आनंदाराव साळुंखे, परवाना अधिकारी आनंद पालव आदींनी मालक असोसिएशनच्या नूतन कार्यालयाला भेट दिली. येथून खासदारांसह इतर लोकप्रतिनिधी व नेत्यांसह मत्स्य विभागाच्या अधिकार्‍यांना संघटना पदाधिकारी विकास उर्फ धाडस सावंत, जावेद होडेकर, नासीर वाघू, मुकेश बिर्जे, किशोर नार्वेकर, पुष्कर भुते, अजिंक्य भोंगले, ओंकार मोरे आदींनी मिरकरवाडा जेटी येथे नेवून असुविधांची माहिती दिली. दोन नंबरची जेटी ढासळण्याच्या स्थितीत असल्याचेही दाखवून देण्यात आले.

तालुका पर्ससीन नेट मच्छिमार मालक असोसिएशनने यावेळी स्वत:च्या समस्याही सांगितल्या. यामध्ये एलईडी प्रकाशात मासेमारीची परवानगी दिल्यानंतर आम्ही 15 ते 20 लाख रुपये खर्च करून ही प्रकाशव्यवस्था करून घेतली. परंतु अचानक ही परवानगी रद्द करण्यात आली. आधीच मच्छिमार मत्स्य दुष्काळामुळे अडचणीत आहे. त्यात अशा नव्या अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे एलईडी लाईट व्यवस्था वापरता यावी, यासाठी शासन पातळीवर प्रयत्न करावा, अशी विनंती करण्यात आली. मच्छिमारांसंदर्भात कोणताही निर्णय घेतला जाताना जी कमिटी बनवली जाईल, त्यात पर्ससीन नेटचे दोन प्रतिनिधी घेण्यात यावेत, अशी विनंतीही असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांनी केली.

स्थानिक मच्छिमार आपापसात भांडत बसत आहेत. मात्र त्याचवेळी परराज्यातील मच्छिमार येथे येवून सरसकट मासळी मारून नेत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या परकीय चलनाचे नुकसान होत असून यातूनही मार्ग काढून द्यावा, अशी विनंती करण्यात आली. खासदारांसह आ.सामंत यांनी याप्रकरणी योग्य ते प्रयत्न करण्याचे आश्‍वासन दिले आहे. दरम्यान मच्छिमार नेते सुलेमान मुल्ला, इम्रान मुकादम, नगरसेवक सुहेल साखरकर यांनीही मच्छिमारांच्या अडचणी खासदार आणि आमदारांच्या कानावर घातल्या. तालुका पर्ससीन नेट मच्छिमार मालक असोसिएशनने मागण्यांचे निवेदनही दिले आहे. 
WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DEeePAgbWU94pj0zgYWo19