Mon, Jan 27, 2020 11:15होमपेज › Konkan › खा. राऊतांनी स्वत:चीच उमेदवारी जाहीर केली

खा. राऊतांनी स्वत:चीच उमेदवारी जाहीर केली

Published On: Mar 20 2019 1:15AM | Last Updated: Mar 20 2019 1:15AM
चिपळूण : खास प्रतिनिधी

विरोधक आज सुसंस्कृतपणाचा आव आणत आहेत. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी याआधीच नीलेश राणे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र, खासदार विनायक राऊत हे शिवसेनेने उमेदवारी जाहीर केलेली नसतानाच स्वत:च उमेदवारी जाहीर करीत आहेत. त्यामुळे जनता सूज्ञ आहे. ती योग्य तो निर्णय घेईल, असे स्वाभिमानचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष मंगेश शिंदे म्हणाले.

शहरातील स्वाभिमानच्या कार्यालयात मंगळवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी नगरसेवक परिमल भोसले, तालुका अध्यक्ष अजय साळवी, युवक उपाध्यक्ष वैभव वीरकर, इरशाद वांगडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. 

यावेळी मंगेश शिंदे म्हणाले, विरोधकांचा आम्हाला बोलते करण्याचा हेतू आहे. मात्र, या निवडणुकीच्या निमित्ताने आम्ही तीच चूक करणार नाही. ते कोणत्याही परिस्थितीत साध्य होणार नाही. एका साध्या नगरसेवकाबरोबर माजी खासदाराची तुलना खासदार करीत असतील तर तो त्यांच्या खासदारकीचा आणि मतदारांचा अपमान आहे. ते आमच्या निवडणूक चिन्हावरुन बोलतात. त्यामुळे त्यांचा सुसंस्कृतपणा त्यातून स्पष्ट होत आहे. 

शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन कदम यांचे नाव लोटे हल्ला प्रकरणात असताना ते राजरोसपणे फिरत आहेत. शिवसेनेच्या सभा, बैठकांमध्ये व्यासपीठावरुन भाषणे ठोकत आहेत. सत्तेचा वापर करुन त्यांनी स्वत:चे नाव वगळले आहे. येथील जिल्हा पोलिस अधीक्षक, खेडचे उपविभागीय पोलिस अधिकारी स्वत:ला कर्तव्यदक्ष म्हणत असतील तर त्यांना 38 नंबरचा आरोपी का मिळत नाही? त्यामुळे विरोधक सरकारचा दुरूपयोग करीत आहेत. येत्या काही दिवसात त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर स्वाभिमान तीव्र आंदोलन छेडेल.  जि. प.चे माजी अध्यक्ष बुवा गोलमडे यांना राजकीय फायद्यासाठी रुग्णालयात नेले नाही तर त्यांची परिस्थिती हलाखीची असल्याने उपचार व्हावेत हा त्या मागचा हेतू आहे. गोलमडे यांच्यावर राजकीय हेतूने उपचार करण्यात आले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले

विरोधी पक्षाचे ठेकेदारच लोकसभेच्या प्रचारात

स्वाभिमान पक्ष विकासाच्या मुद्यावर लढणार आहे. कोकणचा विकास नारायण राणेच करू शकतात हे सर्वांना माहीत आहे. मात्र, मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणामध्ये विरोधकांच्या काही पदाधिकार्‍यांनीच कामाचे ठेके घेतले आहेत. जिल्हाप्रमुख, क्षेत्रप्रमुख, संपर्कप्रमुख, आमदार अशांचे ठेके आहेत. त्यामुळे त्यांच्याबाबत स्वकियांतच नाराजी व्यक्‍त होत आहे. त्यामुळे हे नाराज आमच्याबरोबर आहेत. विरोधकांच्या प्रचारात हे चौपदरीकरणाचे ठेकेदारच दिसत आहेत, अशी टीका शिंदे यांनी यावेळी केली.