Mon, Apr 22, 2019 15:40होमपेज › Konkan › ‘सीआरझेड 2018’ रद्दसाठी खासदारांचा पाठिंबा : सुरेश प्रभू

‘सीआरझेड 2018’ रद्दसाठी खासदारांचा पाठिंबा : सुरेश प्रभू

Published On: Jul 28 2018 1:34AM | Last Updated: Jul 27 2018 11:16PMमालवण : प्रतिनिधी

किनारपट्टीवर वास्तव्यास असणार्‍या मच्छीमारांशी कोणत्याही प्रकारची चर्चा न करता त्यांना विश्‍वासात न घेता प्रसारीत करण्यात आलेली ‘सीआरझेड 2018’ अधिसूचना तात्काळ रद्द केली जावी, या नॅशनल फिशवर्कर्स फोरमच्या मागणीला देशभरातील नऊ किनारी खासदारांसह केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांनी नवी दिल्ली येथे झालेल्या चर्चासत्रात पाठिंबा दर्शविला. संसदेत याप्रश्‍नी आवाज उठविण्याचे आश्‍वासन खासदारांनी दिले. यावेळी महाराष्ट्रातून खा. विनायक राऊत, हुसेन दलवाई, राजेंद्र गावित आदी उपस्थित होते.

नवी दिल्ली येथील कॉन्सिट्युशन क्लब ऑफ इंडिया येथील चर्चासत्रात नॅशनल फिशवर्कर्स फोरमचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, सरचिटणीस टी. पीटर, वर्ल्ड फिशरमेन फोरमचे सदस्य लिओ कोलासो, महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती कार्याध्यक्ष रामकृष्ण तांडेल, गोव्याचे ओलिन्सिओ, पश्‍चिम बंगालचे प्रदीप चटर्जी यांनी एनएफएफच्या वतीने मनोगत व्यक्‍त केले. गुरूवारी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी व केंद्रीय पर्यावरण मंत्री हर्षवर्धन यांची भेट एनएफएफच्या शिष्टमंडळाकडून घेतली जाणार आहे.

मच्छीमार खरे रक्षणकर्ते

सुरेश प्रभू म्हणाले, किनारपट्टीवर वर्षानुवर्षे वास्तव्यास असलेले मच्छीमार हेच खरे समुद्राचे रक्षणकर्ते आहेत. कित्येकांना ते अन्‍न पुरवतात. त्यांच्या हक्‍कांचे संरक्षण हे झालेच पाहिजे. त्यासाठी मी कटिबद्ध आहे. मी मच्छीमारांसोबत आहे.

स्थानिक राज्यभाषेत मसुदा हवा

खा. विनायक राऊत म्हणाले, मच्छीमारांशी कुठल्याही प्रकारची चर्चा न करता प्रसिद्ध करण्यात आलेल्या सीआरझेड 2018 च्या मसुद्याला आपला विरोध आहे. हा मसुदा रद्द व्हावा यासाठी आपण संसदेत मागणी करणार आहोत. तसेच मसुदा सागरी राज्यांच्या स्थानिक भाषांमध्ये प्रसिध्द व्हायलाच हवा यासाठी आपण आग्रही आहोत. मच्छीमारांवर अन्याय होऊ देणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. 
हुसेन दलवाई यांनीही काँग्रेस पक्षाच्या वतीने पाठिंबा दर्शवत मच्छीमारांच्या मागणीचे समर्थन केले. चर्चासत्रात खा. राजेंद्र गावित (पालघर), खा. नरेंद्र सावईकर (दक्षिण गोवा), खा. लालुभाई पटेल (दीव दमण), खा. के. व्ही. थॉमस (केरळ), खा. महंमद सलीम आणि खा. प्रदीप भट्टाचार्य (दोन्ही प. बंगाल) आदी खासदारांनी सहभाग घेऊन मच्छीमारांना पाठिंबा दर्शविला. दिल्ली सरकारच्या वतीने कामगार मंत्री गोपाल रॉय यांनी पत्र पाठवून मच्छीमारांना पाठिंबा दिला.

सिंधुदुर्गातील समस्येकडे लक्ष वेधले

नवी दिल्लीतील या चर्चासत्रात मालवणातून ज्येष्ठ मच्छीमार नेते रमेश धुरी, कार्यकारिणी सदस्य रवीकिरण तोरसकर आणि पत्रकार महेंद्र पराडकर उपस्थित होते. महेंद्र पराडकर यांनी विकास अध्ययन केंद्र मुंबई व ब. नाथ पै सेवांगण यांनी प्रकाशित केलेले ‘सीआरझेड आणि निवार्‍याचा हक्‍क’ हे पुस्तक सुरेश प्रभू, विनायक राऊत, हुसेन दलवाई आणि राजेंद्र गावित यांना भेट दिले. सिंधुदुर्गातील मच्छीमारांना नवीन घर उभारणीसाठी येणार्‍या सीआरझेडच्या अडचणी दूर करण्यासंदर्भात यावेळी लक्ष वेधण्यात आले.