कुडाळ ः प्रतिनिधी
चिपी विमानतळ हद्दीमध्ये पालकमंत्री दीपक केसरकर यांचा काहीही संबंध नाही. मुळात पालकमंत्र्यांना चिपी विमानतळावर येण्याचा अधिकार काय? चिपी विमानतळावर विमान उतरवून त्यांनी एक प्रकारे घुसखोरी केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, अशी मागणी खा. नारायण राणे यांनी केली.
चिपी विमानतळावर 12 डिसेंबर रोजी विमानाचे टेस्ट लॅडिंग झाल्यानंतर नारायण राणे यांनी गुरूवारी सकाळी या विमानतळाची पाहणी केली. आयआरबी कंपनीचे प्रकल्प अधिकारी राजेश लोणकर, मुख्य जनसंपर्क अधिकारी जयंत डांगरे, किरणकुमार, यांच्याकडून कामाबाबत माहिती घेतली. यावेळी खा.राणे यांनी विमानतळाच्या बांधकामाबाबत कौतुक केले. त्यानंतर आयआरबी कंपनीच्या कॉन्फर्रस हॉलमध्ये आयआरबी कंपनीचे आधिकार्यांसोबत चर्चा केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाअध्यक्ष दत्ता सामंत, जि.प. अध्यक्षा सौ. रेश्मा सावंत, जिल्हा बॅक अध्यक्ष रणजीत देसाई, मनिष दळवी, वंदना किनळेकर,एमआयडीसीचे उपअभियंता अविनाश रेवंडकर, आयआरबीचे योगेश मेहत्रे आदी उपस्थित होते.
खा.राणे म्हणाले, चिपी विमानतळाला आपण आज दिलेली ही भेट विमानतळाचे काम किती झाले? कोणत्या परवानग्या येणे बाकी आहेत? विमान प्रत्यक्षात केव्हा सुरू होईल? याची माहिती घेण्यासाठी होती. चिपी विमानतळाचा 2500 मि.चा रन-वे आहे. त्यावेळी प्रत्यक्षात 3 हजार 400 मि.च्या रन-वे ची मंजुरी घेतली असून राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटून मंजूर रन-वे ची लांबी कायम ठेवण्याबाबत आपण प्रयत्न करणार आहेत. या विमानतळाला केंद्र शासनाच्या काही परवानग्या मिळणे अद्याप बाकी आहेत. त्या परवानग्या प्राप्त झाल्यानंतर दोन महिन्यांत म्हणजेच 31 डिसेंबर पर्यंत किंवा जानेवारी 19 मध्ये विमान वाहतूक सुरू होईल, असा माझा अंदाज आहे. विमानतळाच्या आतील व बाहेरील कामे वेळेत कशी पूर्ण होतील त्याकडे लक्ष द्या याबाबत अधिकार्यांना सूचना दिल्या असल्याचे सांगितले. चिपी, परूळे, कुशेवाडा व कर्ली या चार गावातील रस्ते व नागरी सुविधा लवकरच होण्याबाबत शासनाने व आयआरबी कंपनीने मदत करावी, कारण या गावातील मंडळींनी विमानतळ होण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य केले आहे. विमानतळाकडे येणार्या केबल संबंधी काही गैरसमज झाले आहेत पण मी अधिकार्यांशी बोलताना याबाबत स्पष्ट पणे सांगितले आहे कि, त्या केबल जमिनीवरून टाकल्या गेल्या तर त्या जमिन मालकांना जमिनीचा मोबदला हायवेच्या चौपदरीकरणाप्रमाणे मिळावा अशी ग्रामस्थांच्यावतीने आपली मागणी आहे. याकरिता या चार गावातील लोकांनी एक स्वतंत्र कमिटी स्थापन करावी व आपल्या मागण्या मान्य करून घ्याव्यात, असे आवाहन केले.
12 संप्टेंबरला उतरलेले विमान हे मुळात अधिकृत नव्हतेच तर ती पालकमंत्र्यांची हौस मजा होती. मी याठीकाणी टिका करायला आलेलो नाही. या विमानतळाला जमीन देण्यापासून मी काम केलेले आहे. 12 सप्टेंबरला ला उतरविलेल्या त्या विमानातून पालकमंत्री बसून का आले नाहीत? बिचार्या गणपतीला बसवून विमान उतरवले,असे राणे यांनी सांगितले.
कामाला विरोध करू नका
चिपी विमानतळ कामाच्या पाहणी दरम्यान नारायण राणे यांनी आयआरबी कंपनीच्या अधिकार्यांसमोरच विमानतळाच्या कामाचे कौतुक केले. दरम्यान हा चांगला प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या कामाला कुणीही विरोध करू नये, असे आयआरबी कंपनीचे अधिकारी व पदाधिकार्यांच्या बैठकीत राणे यांनी सांगितल्याचे समजते.