होमपेज › Konkan › महागाईविरोधात कुडाळमध्ये मनसेची रॅली

महागाईविरोधात कुडाळमध्ये मनसेची रॅली

Published On: Jun 01 2018 2:05AM | Last Updated: May 31 2018 10:38PMकुडाळ : शहर वार्ताहर

पेट्रोल-डिझेल दरवाढ व वाढती महागाई यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. यासंदर्भात सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गुरुवारी कुडाळात बैलगाडी व सायकल मोर्चा काढत केंद्र  व राज्य सरकारचा निषेध केला. त्यानंतर सरकारच्या निषेधाबाबतचे निवेदन  प्रांताधिकारी डॉ. विकास सूर्यवंशी यांच्याकडे दिले.

देशात व राज्यात पेट्रोल-डिझेलचे दर भरमसाठ वाढले असून  जीवनावश्यक   वस्तूंचीही महागाई  दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे  गोरगरीब  जनता त्रस्त झाली आहे. यासंदर्भात सरकारचा  निषेध नोंदवण्याकरिता  जिल्हा मनसेच्या वतीने हा निषेध मोर्चा काढण्यात आला. कुडाळ गांधी चौक येथून  या मोर्चाला सुरुवात झाली.जिजामाता चौक मार्गे येथील प्रांत कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात सायकल व बैलगाड्या सहभागी  करून  मनसैनिकांनी ‘मोदी सरकार हाय हाय, पेट्रोल-डिझेल दरवाढ कमी करा, नायतर खुर्च्या खाली करा’, ‘पेट्रोल-डिझेल दरवाढ करणार्‍या सरकारचा जाहीर निषेध’,अशा घोषणा दिल्या. 

सरकारच्या निषेधाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांच्याकडे निवेदन देण्यासाठी प्रांताधिकारी डॉ. सूर्यवंशी यांच्याकडे ते देण्यात आले. पेट्रोल-डिझेलसह  जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या महागाईची  झळ सर्वसामान्य  जनतेला बसत आहे. डिझेल दरवाढीमुळे एसटीचीही दरवाढ होणार आहे. भाजप-सेना युती सरकरने  निवडणुकीत अच्छे दिनची स्वप्ने दखवून  जनतेची फसवणूक केली आहे. कालच केंद्र सरकारने  पेट्रोल-डिझेल 80 पैसे घट केल्याची  घोषणा करून प्रत्यक्षात  एक पैसा घट करून जनतेची कुचेष्टा  केली आहे. गोवा, गुजरात राज्यात पेट्रोल-डिझेल महाराष्ट्रापेक्षा अधिक स्वस्त मिळत असताना  महाराष्ट्र राज्यात स्वस्त का देऊ शकत नाही, असा सवाल  उपस्थित करीत यासंदर्भात केंद्र व राज्य सरकारचा मनसे सायकल, बैलगाडी मोर्चाद्वारे निषेध करीत  असल्याचे या निवेदनात  नमुद करण्यात आले आहे. 

सरचिटणीस तथा  माजी आ. परशुराम उपरकर,जिल्हाध्यक्ष  धीरज परब, उपजिल्हाध्यक्ष दत्ताराम गांवकर, दयानंद मेस्त्री, सचिव बाळा पावसकर, महिला जिल्हाध्यक्षा सौ. चैताली भेंडे, परिवहन महामंडळ  जिल्हाध्यक्ष राजू कासकर, महिला उपाध्यक्षा सौ. श्रेया  देसाई,परिवहन राज्य उपाध्यक्ष बनी नाडकर्णी, कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे, सावंतवाडी तालुकाध्यक्ष गुरूदास  गवंडे, कणकवली  तालुकाध्यक्ष दत्ताराम बिडकर,देवगड तालुकाध्यक्ष सचिन गवंडे, मालवण तालुकाध्यक्ष विनोद सांडव,  सचिव राजेश टंगसाळी, माजी तालुकाध्यक्ष बाबल गावडे, गणेश वाईरकर, महिला  तालुकाध्यक्षा सुप्रिया  मेहता, विभाग अध्यक्ष दिपक गावडे, सुशांत राऊळ  आदीसह  जिल्ह्यातील मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.