Sat, Apr 20, 2019 07:54होमपेज › Konkan › मुख्यमंत्री-मंत्री आले नि गेले!

मुख्यमंत्री-मंत्री आले नि गेले!

Published On: May 30 2018 2:19AM | Last Updated: May 29 2018 11:12PMकणकवली : प्रतिनिधी

सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने नारायण राणे यांनी सुरू केलेल्या लाईफटाईम हॉस्पिटलच्या उपक्रमास आपण शुभेच्छा देतो, मात्र या कार्यक्रमासाठी आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे, सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सुधारण्याबाबत व इतर प्रश्‍नांबाबत कोणतेही भाष्य केले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील प्रश्‍नांचे या मंत्र्यांना गांभिर्यच नसल्याचे दिसून येते असा टोला मनसे नेते परशुराम उपरकर यांनी लगावला.

कणकवलीतील संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उपरकर म्हणाले, आज सिंधुदुर्ग जिल्ह्याची शासकीय आरोग्य यंत्रणा अपुरे डॉक्टर,  अपुरा औषध पुरवठा, अपुर्‍या सुविधांमुळे कोलमडली आहे. मात्र त्यावर मुख्यमंत्री किंवा अन्य मंत्र्यांनी काहीच भाष्य केले नाही. पाहुण्यासारखे आले आणि निघून गेले. सिंधुदुर्गातील जिल्हा, उपजिल्हा, ग्रामीण रूग्णालयांना सक्षम करण्याची गरज आहे. या अपुर्‍या सुविधांमुळे रूग्णांना गोवा, कोल्हापूरचा आधार घ्यावा लागतो. ही सरकारी आरोग्य यंत्रणा सामान्य जनतेसाठी आधारवड असताना ती सक्षम करणे ही शासनाची जबाबदारी नाही का? असा सवालही परशुराम उपरकर यांनी केला.

जिल्ह्याच्या शासकीय रूग्णालयांमध्ये सोयीसुविधाच नसतील तर सामान्य जनतेने जायचे कुठे? महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गत राज्यातील 37 हजार रूग्णांनी लाभ घेतल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मात्र याचा सिंधुदुर्ग जिल्ह्याला काय फायदा झाला, असे सांगत उपरकर म्हणाले, सरकार कुणाचेही आले तरी परिस्थिती बदलणार नाही. आज कणकवलीसारखे उपजिल्हा रूग्णालय महामार्गावर असूनही ट्रॉमाकेअर सेंटर कार्यान्वित झालेले नाही. अनेक सुविधांचा अभाव या ठिकाणी आहे. सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्ह्यातील रस्ते खड्डेमुक्तीची घोषणा केली होती. मात्र भाजपच्या कार्यकर्त्यांना जिल्ह्यातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांचा विसर पडला की काय? असा सवालही उपरकर यांनी केला.

ते म्हणाले, कणकवली नगरपंचायत निवडणुकीतील राजकारणावरून सेना-भाजपची नेते मंडळी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. मुळात शिवसैनिकांना भाजपशी युती नकोच होती. मात्र तरीही युती करण्यात आली. त्यामुळे शिवसैनिकांचा हिरमोड झाला. त्याचे प्रायश्‍चीत घ्यावे लागले, आता केवळ जनतेची दिशाभूल करण्यासाठी आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत, असा टोला परशुराम उपरकर यांनी लगावला.