Sat, Jul 20, 2019 15:11होमपेज › Konkan › वृक्षलागवडीला आमदारांचाही निधी

वृक्षलागवडीला आमदारांचाही निधी

Published On: May 11 2018 1:38AM | Last Updated: May 10 2018 9:05PMसंगमेश्‍वर : वार्ताहर

वैश्‍विक तापमानामध्ये होणारी वाढ, हवामानातील बदल याकडे शासनाने गांभीर्याने लक्ष घालत येत्या तीन वर्षांत 50 कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. यावर्षी 13 कोटी वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. या मोहिमेमध्ये आता आमदारांनाही सहभागी करून घेण्यात आले असून त्यांना मिळणार्‍या स्थानिक विकास फंडातून 5 लाख ते 25 लाख रुपयांचा निधी वृक्षारोपण व त्याचा प्रचार तसेच प्रसिद्धीसाठी करण्याचे अधिकार त्यांना देण्यात आले आहेत.

आघाडी सरकारच्या काळात राबवण्यात येत असलेली शतकोटी वृक्षलागवड गुंडाळण्यात आली. शंभर कोटी वृक्षलागवडीचा संकल्प करत ही योजना 2012-13 मध्ये अंमलात आणली होती. 2014 पर्यंत या योजनेंतर्गत वृक्ष लावले गेले. गतवर्षी शासनाने लोकसहभागातून 50 कोटी वृक्षलागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले 2019 पर्यंत हे उद्दिष्ट पूर्ण करायचे आहे. गतवर्षी एकाच दिवशी दोन कोटी वृक्षलागवड करण्यात आली होती. यावर्षी 13 कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवण्यात आले आहे.

शतकोटी वृक्षलागवड योजनेतील अडचणींवर अभ्यास करून शासनाने नवीन योजना अंमलात आणली. आता यामध्ये आमदारांनाही सहभागी करून घेण्यात येणार आहे. शासनाने आमदार निधी खर्चाबाबत नव्याने काही मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्यामध्ये येत्या आर्थिक वर्षात आमदारांना मिळणार्‍या स्थानिक विकास निधीपैकी वृक्षारोपण आणि त्याचा प्रचार व प्रसिध्दीसाठी आपल्या विधानसभा मतदारसंघात 5 लाख ते 25 लाख रूपयांपर्यंत निधी खर्च करण्याची मुभा आमदारांना देण्यात आली आहे.

जुलै महिन्यात लावायच्या वृक्षलागवडीची आतापासून तयारी सुरु झाली आहे. प्रत्येक विभाग व खाती आपल्या अधिपत्याखाली किती झाले लावू शकेल, त्यासाठी किती जागा लागणार, त्या जागेत किती खड्डे होणार,  रोपे किती लागणार, ही रोपे कुठून आणणार याचे नियोजन करण्यात आले आहे. शासनाच्या विविध 26 विभागांना हे उद्दिष्ट देण्यात आले आहे.