होमपेज › Konkan › आमदार उदय सामंत यांनी स्वीकारला ‘म्हाडा’ अध्यक्षपदाचा पदभार

गोरगरिबांना स्वस्त घरे मिळवून देणार : उदय सामंत

Published On: Sep 11 2018 1:37AM | Last Updated: Sep 10 2018 8:55PMरत्नागिरी : विशेष प्रतिनिधी

कोकणात ‘म्हाडा’च्या जमिनी कमी असल्या तरी त्या उपलब्ध करून घेण्यासह गोरगरीब जनतेला परवडेल अशा दरात स्वत:च्या हक्‍काचे घर मिळवून देणार असल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण महामंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष उदय सामंत यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर व्यक्‍त केली. शिवसेना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि शिवसैनिकांच्या उपस्थितीत त्यांनी सोमवारी कार्यभार स्वीकारला.

शिवसेना नेते आ. उदय सामंत यांना महाराष्ट्र ‘म्हाडा’चे अध्यक्षपद मिळाल्यानंतर जिल्ह्यात आनंद पसरला होता. त्याचे प्रतिबिंब सोमवारी कार्यभार स्वीकारण्यास गेलेल्या आ. सामंतांना अनुभवण्यास मिळाला. जिल्ह्यातील शिवसेनेचे बहुतांश पदाधिकारी, आमदार, शेकडो शिवसैनिक मुंबईत गेले होते. सोमवारी सकाळी 11.30 वा. बांद्रा येथील ‘म्हाडा भवन’ येथे ‘म्हाडा’ अध्यक्षांचे कार्यालय आहे.

खा. विनायक राऊत, मुंबईचे महापौर विश्‍वनाथ म्हाडेश्‍वर, आ. राजन साळवी, जिल्हाप्रमुख विलास चाळके, शिवसेना नेते खा. अनिल देसाई, आ. अनिल परब आदी प्रमुख नेतेही यावेळी आवर्जून उपस्थित होते. या महामंडळाचे सुमारे सात हजार कोटी रूपयांचे बजेट असून आयएएस अधिकार्‍यांसह सुमारे 2 हजार इतका स्टाफ आहे. कोकणातील गरिबांना आपल्या पदाचा लाभ व्हावा, अशा दिशेने काम करून ‘मातोश्री’चा विश्‍वास सार्थ ठरवीन, अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी व्यक्‍त केली.