Thu, Jan 30, 2020 00:14होमपेज › Konkan › आ. संजय कदमांना सश्रम कारावास

आ. संजय कदमांना सश्रम कारावास

Published On: Jul 23 2019 1:18AM | Last Updated: Jul 22 2019 10:04PM
खेड : प्रतिनिधी

शासकीय कामात अडथळा आणि तहसील कार्यालयात तोडफोड केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे दापोलीचे आमदार संजय कदम यांच्यासह सहाजणांना जिल्हा सत्र न्यायालयाने दोषी ठरवून एक वर्षाचा सश्रम कारावास ठोठावला आहे. या प्रकरणी उच्च न्यायालयात अपिलाची मुदत संपण्यापूर्वीच आ. कदम यांच्यासह सहकार्‍यांनी सोमवारी येथील न्यायालयासमोर शरणागती पत्करली. यानंतर त्यांच्यासह सहाजणांना एक वर्षाच्या सश्रम कारावासासाठी जिल्हा कारागृहात पाठविण्यात आले आहे. 

रत्नागिरी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष असताना संजय कदम आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी सन 2005 मध्ये खेड तहसील कार्यालयाची तोडफोड केली होती. या प्रकरणी तत्कालीन प्रांताधिकारी प्रवीण गेडाम यांनी कदम यांच्याविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार केली होती. या प्रकरणी खेड सत्र न्यायालयात सुनावणी सुरू होती. अखेर  न्यायालयाने याबाबतचा निर्णय देताना दि. 2 डिसेंबर 2015 रोजी आ. कदम यांच्यासह सहा जणांना 1 वर्ष सश्रम कारावास व प्रत्येकी 3 हजार 500 रुपये दंड अशी शिक्षा सुनावली होती. दरम्यान, आ. कदम यांनी पाच हजार रुपयांचा जामीन आणि साडेतीन हजार रुपयाचा दंड जमा केला होता.
या प्रकरणी खेड येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात तीन अपील दाखल झाली होती. त्यामध्ये सरकारी पक्ष व पीडित यांच्यातर्फे शिक्षा वाढावी यासाठी दोन तर आरोपीतर्फे शिक्षेचा फेरविचार व्हावा म्हणून याचिका करण्यात आली होती. या तिन्ही याचिका खेड येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळून लावल्या व खालील न्यायालयाने दिलेला निकाल कायम ठेवला. हा निकाल 11 जुलै 2019 रोजी देण्यात आला व आ. कदम यांना अपिलात जाण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत देण्यात आली. 

आरोपी आ. संजय कदम, नामदेव शेलार, विजय जाधव, हरिश्चंद्र कडू, प्रकाश मोरे व सुषमा कदम यांना उच्च न्यायालयात अपील करण्यासाठी मुदत असताना त्यांनी मुदतीपूर्वीच न्यायालयासमोर शरणागती पत्करली आहे. सोमवारी सायंकाळी या सहाजणांची रत्नागिरी येथील जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली. 

जिल्ह्यातील पहिलीच घटना

या प्रकरणी आ. संजय कदम यांच्यासह सहाजण दि. 23 रोजी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज सादर करणार आहेत, अशी माहिती आ. कदम यांच्या वकिलांनी पत्रकारांना दिली. या प्रकरणानंतर खेड न्यायालयासमोर आ. कदम समर्थक व कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. रत्नागिरी जिल्ह्याच्या एका आमदाराची सश्रम कारावास शिक्षेसाठी जिल्हा कारागृहात रवानगी होण्याची ही पहिलीच घटना आहे.