होमपेज › Konkan › वक्‍तृत्वाबरोबर कर्तृत्वालाही महत्त्व द्या : आ. नितेश राणे

वक्‍तृत्वाबरोबर कर्तृत्वालाही महत्त्व द्या : आ. नितेश राणे

Published On: Dec 20 2017 1:41AM | Last Updated: Dec 19 2017 11:39PM

बुकमार्क करा

कणकवली  : वार्ताहर

समाजातील सर्वधर्मीयांमध्ये एकोपा निर्माण करण्याचे मोठे कार्य डॉ. राज अहमद पटेल यांनी केले आहे. त्यांच्या नावाने ट्रस्ट स्थापन करत तो वारसा पुढे जोपासण्याचा प्रयत्न बुलंद पटेल व सहकारी करत आहेत. भावी पिढीच्या बौद्धिक व कलात्मक विकासात वाढ  होण्यासाठी वक्तृत्व व प्रश्‍नमंजुषा स्पर्धांसारखे उपक्रम उल्लेखनीय आहेत. विद्यार्थ्यांनी वक्तृत्वाबरोबरच कर्तृत्वालाही महत्त्व द्यावे, असे आवाहन आ. नितेश राणे यांनी केले.

डॉ. राज अहमद हुसेनशा पटेल चॅरिटेबल ट्रस्ट हरकुळ ब्रुद्रुक आयोजित कै. लहू विश्राम नाथगोसावी स्मृती जिल्हास्तरीय वक्तृत्व व प्रश्‍नमंजुषा स्पर्धेचे ल. गो. सामंत विद्यालयात आयोजन करण्यात आले होते.  स्पर्धेचे उद्घाटन आ. नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, माजी उपसभापती बाबासाहेब वर्देकर, सरपंच बंडू ठाकूर, ट्रस्टचे अध्यक्ष बुलंद पटेल, नवनिर्वाचित सरपंच गौसिया पटेल, राकेश नारायणन, सोसायटी चेअरमन डॉ. अनिल ठाकूर, उपसरपंच राजू पेडणेकर, केंद्रप्रमुख सुनील हरकुळकर आदी  उपस्थित होते.

सतीश सावंत म्हणाले, माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे कर्तृत्वाबरोबरच वक्तृत्वामुळे राज्यात नावारूपास आले. वक्तृत्वाची कला असणे महत्त्वाचे म्हणून डॉ. राज अहमद पटेल ट्रस्ट आयोजित या उपक्रमास धन्यवाद दिले पाहिजेत. व्यक्तिमत्व विकासात वक्तृत्व कला हा महत्वाचा भाग आहे, असे सांगितले. बाबासाहेब वर्देकर यांनीही विचार व्यक्त केले. सरपंच बंडू ठाकूर, उपसरपंच राजू पेडणेकर यांचा सन्मान व नवनिर्वाचित सरपंच गौसिया पटेल यांना आ. राणे यांनी शुभेच्छा दिल्या.