Tue, Apr 23, 2019 00:22होमपेज › Konkan › शिक्षकांबरोबरच पदवीधर मतदारांच्या गाठीभेटी 

कोकण पदवीधर निवडणूक प्रचारासाठी आ. नाईक मैदानात

Published On: Jun 19 2018 1:31AM | Last Updated: Jun 18 2018 10:39PMकुडाळ : प्रतिनिधी

कोकण विधान पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेना जिल्हाप्रमुख आ. वैभव नाईक यांनी  शिवसेना उमेदवार संजय मोरे यांच्या प्रचारार्थ जिल्ह्यात झंझावाती दौरा सुरू  केला आहे. शाळांना भेटी देवून ते शिक्षक मतदारांच्या भेटीगाठी घेत शाळांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. आ. नाईक यांच्या या दौर्‍याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आ. नाईक  यांच्यासोबत युवा सेना पदाधिकारी व महिला पदाधिकारीही प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत.  

कोकण विधान  पदवीधर मतदारसंघाची निवडणूक सोमवार 25 जूनला होत आहे.  पूर्वी ही जागा सलग तीन टर्म भाजपकडे तर मागच्यावेळी भाजप, सेनेच्या अंतर्गत गटबाजीमुळे राष्ट्रवादी कडे गेली होती. मात्र आता  राष्ट्रवादीचे वजनदार नेते निरंजन डावखरे यांनी भाजपमध्ये प्रवेश करून पुन्हा रिंगणात उडी घेतली आहे. निरंजन डावखरेंच्या भाजपा प्रवेशामुळे राष्ट्रवादीहीआक्रमक झाली असून राष्ट्रवादीने ही निवडणूक जिंकायचीच असा पण करून नसीम मुल्ला यांना रिंगणात उतरविले आहे. दुसरीकडे कोकणात चांगल्याप्रकारे संघटनात्मक  ताकद  असलेल्या शिवसेनेने या निवडणूक रिंगणात ठाण्याचे माजी महापौर संंजय मोरे यांना उमेदवारी दिली आहे.  

शिवसेना, युवा सेना पदाधिकार्‍यांना विजयश्री खेचून आणण्याचे आदेश मातोश्रीवरून देण्यात आले आहेत. परिणामी सिंधुदुर्गात शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पदाधिकारी व युवासेना महिला सेना पदाधिकारी मोरे यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरली आहे. आतापर्यंत आ. नाईक यांनी मालवण वेतोबा हायस्कूल, मालवण टोपीवाला हायस्कूल, कणकवली शहर, माणगांव वासुदेवानंद विद्यालय, हिर्लोक हायस्कूल, वाडोस हायस्कूल, हळदीचे नेरूर हायस्कूल, कुडाळ शहरात पदवीधर मतदारांच्या भेटी-गाठी  घेतल्या.  तसेच पदवीधर शिक्षकांशी चर्चा करून मतदारांच्या समस्या जाणून घेत त्या सोडविण्यासाठी प्रामुख्याने प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही आ. नाईक यांनी दिली. 

मोरेंसाठी सिंधुदुर्गात शिवसेनेची फौज मैदानात

कोकण विधान पदवीधरमतदार संघाच्या निवडणुकीसाठी शिवसेना संजय मोरे यांच्या रुपात प्रथमच निवडणूक रिंगणात उतरली असून या निवडणुकीत युवा सेनाअध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी जातीने लक्ष घातले आहे. परिणामी शिवसेनेच्या प्रमुख मंडळींनी श्री. मोरे यांच्या प्रचारासाठी सर्व ताकद लावली आहे. बांधकाम मंत्री एकनाथ शिंदेंसह खा. विनायक राऊत दोन दिवसात जिल्ह्यात प्रचारासाठी दाखल होतील, असे आ. वैभव नाईक यांनी सांगून मोरेंच्या रुपात शिवसेना या निवडणुकीत विजय  मिळविणारच, असा विश्‍वास व्यक्त केला आहे.