Fri, Jul 19, 2019 01:14होमपेज › Konkan › लोटेतील प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर

लोटेतील प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर

Published On: Dec 16 2017 1:42AM | Last Updated: Dec 16 2017 1:42AM

बुकमार्क करा

खेड : वार्ताहर

लोटे ‘एमआयडीसी’मध्ये गेले काही दिवस प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. येथील दोन कंपन्यांमधून रोज सकाळच्या वेळी सांडपाणी सोडण्यात येते. याशिवाय गॅसही सोडला जातो. या प्रदूषणाबाबत ग्रामस्थांनी तक्रार करूनदेखील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दुर्लक्ष केले आहे. पर्यावरणमंत्र्यांच्या तालुक्यातील औद्योगिक वसाहतीतच पर्यावरणाचा र्‍हास होत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीत काही प्रदूषणकारी कारखाने राजरोसपणे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे व पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवत आहेत. या प्रकारांमुळे लोटे औद्योगिक वसाहतीमधील वायू, जल व भूमी प्रदूषण वाढले असून त्याचा घातक परिणाम खेड व चिपळूण तालुक्यांतील निसर्गसंपदेला भोगावा लागत आहे. रासायनिक कारखान्यांतून उत्पादन प्रक्रिया केल्यानंतर घातक रसायनमिश्रीत सांडपाणी थेट कारखान्यांलगतच्या नैसर्गिक नाले, मोकळ्या जागांवर सोडून देण्याचे प्रकार घडत असताना या प्रकारांकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे चिपळूण येथील विभागीय अधिकारी मात्र डोळेझाक करीत आहेत.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत तलारीवाडी फाटा येथे एक कारखाना सुरू आहे. सोमवार दि.11 रोजी या कारखान्याच्या पश्‍चिमेकडील संरक्षक भिंतीच्या बाजूला रसायनमिश्रीत पाणी तुडुंब भरून वाहत असल्याचे लोटे येथील संजय चाळके, नाना चाळके व अन्य ग्रामस्थांच्या निदर्शनास आले होते. या प्रकाराने परिसरात घातक दुर्गंधी व श्‍वास गुदमरवणारा दर्प पसरला होता. या मोकळ्या जागेत तलारीवाडी येथील ग्रामस्थांची पाळीव जनावरे खाद्याच्या शोधात फिरत असतात त्यामुळे ही बाब ग्रामस्थांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी या प्रकाराचा जाब विचारण्यासाठी कंपनी व्यवस्थापनाला धारेवर धरले. कंपनी व्यवस्थापनाने रसायन हे सांडपाणी प्राथमिक प्रक्रिया केंद्रात वाहून नेणार्‍या पाईप फुटल्याने बाहेर पडल्याचे मान्य करीत पाईपची दुरूस्ती करीत असल्याचे सांगत वेळ मारून नेली. मात्र, पर्यावरणाचा र्‍हास होतच आहे.

रात्रीची प्रदूषण पातळी धोक्याच्या वर...

लोटे औद्योगिक वसाहतीमधील सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे काम सध्या सुरू आहे. त्यामुळे काही कारखानदार लोटे वसाहतीमधील उंच भागांमध्ये बांधलेल्या टाक्यांमध्ये सांडपाणी साठवण करून ते रात्रीच्या वेळेस नैसर्गिक नाले अथवा मोकळ्या जागांमध्ये सोडत असल्याची बाब ग्रामस्थांच्या निदर्शनास आली आहे. हिवाळा असल्याने रात्रीच्या वेळेस गर्द धुक्याचा आधार घेऊन कारखान्यांमधून विषारी वायूचे देखील उत्सर्जन मोठ्या प्रमाणात होत असल्याचे ग्रामस्थांकडून सांगितले जाते.