Fri, Jan 24, 2020 22:29होमपेज › Konkan › तोतया पोलिसांनी वृद्धेचे लुटले सव्वादोन लाखांचे दागिने

तोतया पोलिसांनी वृद्धेचे लुटले सव्वादोन लाखांचे दागिने

Published On: Oct 16 2018 1:41AM | Last Updated: Oct 15 2018 10:56PMरत्नागिरी : प्रतिनिधी

पोलिस असल्याची बतावणी करत भरदिवसा वृद्धेचे सुमारे 2 लाख 20 हजार रुपये किमतीचे दागिने लांबवल्याप्रकरणी दोन अज्ञात चोरट्यांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी साळवी स्टॉप ते नाचणे रस्त्यावर घडली.

याबाबत वैशाली विद्याधर भुते (वय 71, रा. सुपलवाडी  नाचणे, रत्नागिरी) यांनी शहर पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार, सोमवारी सकाळी त्या साळवी स्टॉप ते नाचणे जाणार्‍या रस्त्यावरील रेशन दुकानात गेल्या होत्या. रेशन घेऊन घरी परतत असताना दोन अनोळखी तरुण त्यांच्या दिशेने आले. आपण पोलिस असल्याचे सांगत रस्त्यावर सोन्याचे दागिने चोरण्याचे प्रकार सुरू असल्याची बतावणी केली. त्यामुळे तुम्ही सोन्याचे दागिने घातलेत तर तुम्हाला दोन हजार रुपये दंड होईल, असे सांगत त्यांचे दागिने काढायला लावून ते कागदाच्या पुडीत बांधत त्यांच्या पर्समध्ये ठेवले. दागिने पर्समध्ये ठेवल्यावर ते दोन्ही तरुण साळवी स्टॉपकडे जाणार्‍या रस्त्याने निघून गेले.

ते तरुण निघून गेल्यावर वैशाली भूते यांनी आपली पर्स उघडून त्यातील पुडीत पाहिले असता त्यांना सोन्याच्या दागिन्यांऐवजी प्लॅस्टिकच्या बांगड्या दिसून आल्या. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच वैशाली भूते यांनी शहर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. याबाबत अधिक तपास शरद पोलिस निरीक्षक भरतकुमार शहा करत आहेत.